लम्पीच्या पार्श्वभूमीवर म्हैशींच्या वाहतुकीला सशर्त परवानगी, पण..
By संतोष भिसे | Published: October 3, 2022 06:59 PM2022-10-03T18:59:52+5:302022-10-03T19:00:22+5:30
शेतकऱ्यांनी जनावरांचे ऑनलाईन बाजार सुरु केले आहेत, पण वाहतूक करता येत नसल्याने ऑनलाईन खरेदी-विक्रीमध्ये अडचणी येत होत्या.
सांगली : म्हैस आणि म्हैसवर्गीय जनावरांच्या वाहतुकीसाठी शासनाने सशर्त परवानगी दिली आहे. वाहतुकीसाठी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेले निगेटिव्ह पीसीआर प्रमाणपत्र सक्तीचे केले आहे.
राज्यात लम्पी आजाराचा फैलाव रोखण्यासाठी जनावरांचे बाजार, वाहतूक आदींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. शेळ्या, मेंढ्यांना लम्पीचा संसर्ग होत नसल्याचे स्पष्ट झाल्यावर निर्बंधांतून सूट देण्यात आली, त्यामुळे त्यांचे बाजार भरु लागले. खरेदी-विक्री सुरु झाली. म्हैस आणि म्हैसवर्गीय जनावरांनाही लम्पीची गंभीर लागण होत नसल्याचे स्पष्ट झाले. राज्यात लम्पीचा फैलाव सुरु झाल्यापासून एकाही म्हैशीचा मृत्यू झालेला नाही. संसर्ग झालेल्या म्हैशींमध्ये गंभीर लक्षणे नाहीत, त्यामुळे त्यांनाही निर्बंधांतून सूट देण्याचा निर्णय पशुसंवर्धन विभागाने घेतला आहे.
यासंदर्भात जारी केलेल्या परिपत्रकात म्हंटले आहे की, लम्पीचा संसर्ग झालेल्या एक किलोमीटर परिसरात म्हैशींची वाहतूक करता येणार नाही, पण त्याबाहेरील परिसरात वाहतुकीला परवानगी असेल. त्यासाठी त्यांची पीसीआर चाचणी सक्तीची आहे. ती निगेटिव्ह असेल, तर वाहतूक करता येईल. बाजारातही नेता येईल. या निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सध्या शेतकऱ्यांनी जनावरांचे ऑनलाईन बाजार सुरु केले आहेत, पण वाहतूक करता येत नसल्याने ऑनलाईन खरेदी-विक्रीमध्ये अडचणी येत होत्या. आता म्हैसवर्गीय जनावरांच्या वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.