‘लोकमत’मुळे आत्मविश्वास बळावला
By admin | Published: November 5, 2015 10:52 PM2015-11-05T22:52:54+5:302015-11-05T23:57:19+5:30
तारा भवाळकर : सांगलीत ‘लोकमत’च्या ‘दीपोत्सव’चे थाटात प्रकाशन
सांगली : वेगवेगळ््या उपक्रमांच्या माध्यमातून वाचक निर्माण करतानाच ‘लोकमत’ने सकारात्मक दृष्टिकोनातून जनतेमधील आत्मविश्वासही वाढविण्याचा प्रयत्न केला आहे, असे मत लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक प्रा. तारा भवाळकर यांनी गुरुवारी व्यक्त केले. ‘लोकमत’च्या ‘दीपोत्सव’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन गुरुवारी थाटात करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.
येथील शासकीय विश्रामगृहात प्रकाशन सोहळा झाला. खासदार संजय पाटील, आ. सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले, साहित्य अकादमीचे सदस्य प्रा. अविनाश सप्रे आदी मान्यवरांच्याहस्ते प्रकाशन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भवाळकर होत्या. त्या म्हणाल्या की, दीवाळी हा दिव्यांचाच उत्सव असतो. त्यामुळे ‘लोकमत’ने दिवाळी अंकाला दिलेले नाव अधिक समर्पक आहे. राज्यात, देशात आणि विदेशातही मराठी वाचकांपर्यंत हा अंक पोहोचविण्यात येत आहे. केवळ दिवाळी अंकाच्या माध्यमातूनच नव्हे, तर समाजहिताच्या अनेक गोष्टी अंगिकारून ‘लोकमत’ने वाचक चळवळ सुदृढ केली आहे. त्यामुळे वाचकांचा आणि पर्यायाने समाजाचा आत्मविश्वास उंचावत आहे. पाऊस कमी असला तरी कृष्णाकाठच्या लोकांमध्ये बुद्धिमत्ता आणि कल्पकतेचे पाणी अजूनही खूप आहे. ‘दीपोत्सव’च्या माध्यमातून या दोन्ही गोष्टी अधिक वृद्धिंगत व्हाव्यात.
खासदार पाटील म्हणाले की, ‘लोकमत’ने भडक बातम्या न देता सकारात्मकतेला जवळ केले आहे. दीड लाख वाचकांपर्यंत दीपोत्सव पोहोचवण्याचे यश कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे. दर्जेदार गोष्टी वाचकांपर्यंत पोहोचविण्यात त्यांना यश मिळाले आहे. जिल्हाधिकारी गायकवाड म्हणाले की, ‘लोकमत’ने आता दहा लाख लोकांपर्यंत ‘दीपोत्सव’ पोहोचवावा. अधिकाधिक मराठी वाचकांपर्यंत हा अंक पोहोचणे आणि सकारात्मक गोष्टी समाजात रूजणे गरजेचे आहे. गुन्हेगारी वृत्तांचे संकलन व त्यांना प्रसिद्धी देताना ज्या मर्यादा पत्रकारितेत पाळायला हव्यात, त्या ‘लोकमत’ने जपल्या आहेत. समाजावर याचा सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे ‘लोकमत’च्या उपक्रमांना भविष्यात आणखी यश मिळेल.
कार्यक्रमास वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्य उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी, संचालक मारुती नवलाई, जिल्हाध्यक्ष सचिन चोपडे, मिरज शहराध्यक्ष सुधीर दफ्तरदार, सचिव प्रशांत जगताप, खजिनदार पिंटू पाटील, दरिबा बंडगर, गजानन साळुंखे, विशाल रासनकर, दत्तात्रय सरगर, श्रीपाद रासनकर, लोकराज्य विक्रेता संघटनेचे बाळू पाटील आदी उपस्थित होते. ‘लोकमत’चे संस्थापक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. वितरण विभागाचे सहायक व्यवस्थापक अमर पाटील यांनी स्वागत, तर आवृत्तीप्रमुख श्रीनिवास नागे यांनी प्रास्ताविक केले. शाखा व्यवस्थापक विक्रम हसबनीस यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
उत्सुकता वाढली
‘लोकमत’च्या ‘दीपोत्सव’चा दर्जा वेगळाच आहे. तरीही यंदाच्या अंकाबाबतची उत्सुकता वाढली आहे. सर्वच क्षेत्रातील वाचकांनी असे अंक वाचले पाहिजेत, असे मत आ. सुधीर गाडगीळ यांनी यावेळी व्यक्त केले.