वसंतदादा कारखान्याची मालमत्ता जप्त करा
By Admin | Published: July 17, 2014 11:30 PM2014-07-17T23:30:23+5:302014-07-17T23:39:59+5:30
संघटनेची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सांगली : वसंतदादा साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करुन शेतकऱ्यांची थकित उसाची बिले देण्यात यावीत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांंना निवेदनाद्वारे करण्यात आली. शिष्टमंडळाचे नेतृत्व संघटनेचे विभागीय अध्यक्ष बी. जी. पाटील यांनी केले.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साखर आयुक्तांनी केलेल्या सुनावणीनुसार साखर कारखाना ४ कोटी ३९ लाख ५५ हजार रुपये देणे थकित आहे. हे देणे तात्काळ देण्याचे मान्य करुनही टाळाटाळ सुरु आहे. वसंतदादा साखर कारखान्याची मालमत्ता व उत्पादित साखर जप्त करुन शेतकऱ्यांची थकित उसाची बिले देण्यात यावीत, असा आदेश साखर आयुक्तांनी दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची देणी व्याजासह देण्यासाठी कारखान्याच्या स्थावर व जंगम मालमत्तेची विक्री करुन शेतकऱ्यांची देणी द्यावीत. साखर आयुक्तांनी आदेश देवूनही वसंतदादा कारखाना प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे शेतकऱ्यांतून प्रचंड असंतोष पसरला आहे. कारखान्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी महेश खराडे, सयाजी मोरे, महावीर पाटील, जयकुमार कोले, योगेश पाटील, संजय बेले, नितीन उपाध्ये, शीतल सौदे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)