माजी महापौरांच्या संस्थांवर जप्ती
By admin | Published: August 9, 2016 11:45 PM2016-08-09T23:45:17+5:302016-08-09T23:51:43+5:30
घरपट्टीची थकबाकी : सिद्धिविनायक कॅन्सर रुग्णालयावर आज कारवाई
सांगली : महापालिकेच्या घरपट्टी विभागाने थकबाकी वसुलीसाठी मोहीम तीव्र केली आहे. मंगळवारी माजी महापौर सुरेश पाटील यांच्याशी संबंधित शिक्षण संस्था व वसतिगृहाकडील १९ लाख रुपयांच्या थकबाकीपोटी जप्तीची कारवाई करण्यात आली. संस्थेने थकबाकीची रक्कम भरल्यानंतर कारवाई थांबली. दरम्यान, मिरजेतील सिद्धिविनायक कॅन्सर रुग्णालयावरही कारवाई करण्यात आली असून, बुधवारी जप्तीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ता व एलबीटीच्या थकीत कराच्या वसुलीसाठी जोरदार मोहीम उघडली आहे. थकबाकी वसुलीत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारला जात आहे. सोमवारी वसुली आढावा बैठकीत पाणीपुरवठा अभियंत्यासह पाच जणांना नोटिसा बजाविल्या होत्या. घरपट्टी विभागाकडील वसुली अधिकाऱ्यांनाही आयुक्तांनी धारेवर धरले होते. त्यानंतर घरपट्टी विभागाने मंगळवारी कारवाईची मोहीम तीव्र केली.
माजी महापौर सुरेश पाटील यांच्याशी संबंधित ए. बी. पाटील इंग्लिश स्कूलची १४ लाख, तर कस्तुरबाई वालचंद वसतिगृहाची ८ लाख, अशी २२ लाख रुपयांची थकबाकी होती. या थकबाकी वसुलीसाठी घरपट्टी विभागाने अनेकदा नोटिसा बजाविल्या होत्या. गेल्याच आठवड्यात संस्थेकडून तीन लाख रुपये भरण्यात आले होते. उर्वरित रक्कम भरण्यास मात्र टाळाटाळ सुरू होती. त्यामुळे मंगळवारी घरपट्टी विभागाने थेट जप्तीची कारवाई केली. महापालिकेचे पथक संस्थेत दाखल होताच थकीत १९ लाख रुपये रकमेचा धनादेश देण्यात आला.
त्यानंतर घरपट्टी विभागाने आपला मोर्चा मिरजेतील सिद्धिविनायक कॅन्सर रुग्णालयाकडे वळविला. या रुग्णालयाकडे ५६ लाख रुपयांची थकबाकी आहे. सिद्धिविनायक ट्रस्टने वारंवार घरपट्टीत सवलत देण्याची मागणी केली आहे. पण लेखापरीक्षणातील आक्षेपामुळे महापालिका प्रशासनाने सवलत देण्यास नकार दिला आहे. त्यातून थकबाकी भरण्यासाठी नोटिसा बजावूनही रकमेचा भरणा केलेला नाही. रुग्णालय व्यवस्थापनाने आयुक्तांशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर सायंकाळी आयुक्त खेबूडकर व रुग्णालय व्यवस्थापन यांच्यात बैठक झाली. आयुक्तांनी कर भरण्यासाठी मुदत देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. पैसे भरल्याशिवाय कोणतीही चर्चा होणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केल्याने चर्चा फिसकटली.
महापालिकेने बुधवारी रुग्णालयातील व्यवस्थापन कक्षाला सील ठोकण्याची तयारी सुरू केली आहे. या कारवाईत जप्ती अधिकारी प्रकाश कोळी, रघुवीर हलवाई, अभिजित सटाले, अशोक मुळीक यांच्या पथकाने भाग घेतला होता. (प्रतिनिधी)
एका दिवसात ३४ लाखांची वसुली
घरपट्टी विभागाने मंगळवारी एका दिवसात ३४ लाखांची वसुली केली. यात जप्ती कारवाईतील १९ लाखाचा समावेश आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत जुलै महिन्यातील वसुली तीन कोटीने वाढली आहे. आतापर्यंत ७ कोटी रुपयांची वसुली घरपट्टी विभागाने केली आहे. जुलै महिन्यातच २ कोटी ५६ लाख रुपयांची वसुली झाली आहे.
रॉकेल लाईन भाडेपट्टीवर १८ ला निर्णय
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रॉकेल लाईनच्या भाडेपट्टीबाबत मंगळवारी आयुक्तांसमोर सुनावणी झाली. महापालिकेने बजाविलेली वाढीव भाडेपट्टीची नोटीस चुकीची असल्याचा युक्तिवाद येथील व्यावसायिकांनी केला. या व्यावसायिकांकडे १ कोटी १० लाख रुपयांची थकबाकी आहे. महापालिकेने त्यांना वाढीव भाडेपट्टीच्या नोटिसा बजाविल्या होत्या. त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पण नंतर ही याचिका मागे घेण्यात आली. आता भाडेपट्टीबाबत १८ रोजी अंतिम निर्णय होणार आहे.