यशवंत कारखान्याच्या कर्जवसुलीवरुन खासदार-आमदारांत संघर्ष

By अविनाश कोळी | Published: March 4, 2023 08:58 PM2023-03-04T20:58:42+5:302023-03-04T20:59:00+5:30

एकरकमी परतफेड योजनेवरुन राजकारण रंगले

Conflict between MPs and MLAs over debt recovery of Yashwant factory | यशवंत कारखान्याच्या कर्जवसुलीवरुन खासदार-आमदारांत संघर्ष

यशवंत कारखान्याच्या कर्जवसुलीवरुन खासदार-आमदारांत संघर्ष

googlenewsNext

अविनाश कोळी, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: नागेवाडी (ता. खानापूर) येथील यशवंत साखर कारखान्याच्या थकबाकीचा समावेश एकरकमी परतफेड योजनेत करण्याच्या ठरावाला शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी विरोध केला आहे. शनिवारी बँकेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्याकडे ठराव रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान बाबर यांच्या विरोधानंतर या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्या समवेत बैठक घेणार असल्याचे अध्यक्ष नाईक यांनी स्पष्ट केले.

यशवंत कारखाना हा खासदार संजयकाका पाटील यांच्या गणपती संघाने खरेदी केला होता. या कारखान्याकडे जिल्हा बँकेची कोट्यावधी रुपयांची थकबाकी आहे. बंद अवस्थेतील व थकबाकीत असलेला हा कारखाना बँकेने ताब्यात घेतला आहे. कर्जाच्या वसुलीसाठी एनसीएलटी (राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधीकरण)मध्ये दावा दाखल केला आहे. दुसरीकडे आमदार बाबर यांनी कारखान्याच्या विक्री विरोधात न्यायालयात दावा दाखल केला आहे.

थकबाकीतील बड्या कर्जांच्या वसुलीसाठी जिल्हा बँकेने ओटीएस योजना सुरू केली आहे. यात खासदार पाटील यांनी यशवंत कारखान्याचा प्रस्ताव दिला आहे. परतफेड योजनेअंतर्गत कारखान्यास १७ कोटी भरावे लागणार आहेत. त्यापैकी तीन कोटी रुपये भरल्याची चर्चा आहे. मागील महिन्यात आष्टा येथे संचालक मंडळाच्या बैठकीत यशवंत कारखान्याला योजनेचा लाभ देण्याबाबत ठराव घुसडण्यात आला असल्याचा आरोप आमदार बाबर यांनी केला आहे.

जिल्हा बँकेच्या शनिवारी झालेल्या बैठकीत बाबर यांनी यशवंत कारखान्याच्या एकरकमी परतफेड योजनेतील प्रस्तावास विरोध केला. चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ देत असाल, तर आम्ही गप्प बसणार नाही. खासदारांच्या सर्व संस्थांकडील थकबाकी वसूल करावी. जिल्हा बँकेने प्राधीकरणाकडे जो दावा दाखल केला आहे तो थकीत रक्कम वसूल झाल्याशिवाय मागे घेऊ नये, अशी मागणी बाबर यांनी बैठकीत केली.

Web Title: Conflict between MPs and MLAs over debt recovery of Yashwant factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली