Sangli: तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात अस्तित्वासाठी रक्तरंजित संघर्षाची वाट; नागरिकांच्या प्रश्नांना बगल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 05:31 PM2024-09-30T17:31:26+5:302024-09-30T17:31:55+5:30

दत्ता पाटील तासगाव : कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडीवरून आबा-काका गट एकमेकांना भिडले. दुसऱ्या दिवशी त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न ...

Conflict between R. R. Patil and Sanjaykaka Patil group in Tasgaon-Kavthemahankal Constituency | Sangli: तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात अस्तित्वासाठी रक्तरंजित संघर्षाची वाट; नागरिकांच्या प्रश्नांना बगल

Sangli: तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात अस्तित्वासाठी रक्तरंजित संघर्षाची वाट; नागरिकांच्या प्रश्नांना बगल

दत्ता पाटील

तासगाव : कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडीवरून आबा-काका गट एकमेकांना भिडले. दुसऱ्या दिवशी त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला. तूर्तास पडदा पडला असला, तरी खरे नाट्य विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात पाहायला मिळणार आहे. आबा, काका गटाच्या नेत्यांकडून अस्तित्वाची लढाई जिंकण्यासाठी पुन्हा एकदा रक्तरंजित संघर्षाची वाटचाल सुरू झाल्याचे यानिमित्ताने पाहायला मिळाले. जनतेच्या प्रश्नांना बेदखल करणाऱ्या नेतेमंडळींनी खुर्चीसाठी सुरू केलेला संघर्ष सामान्य जनतेच्या पचनी पडणारा नाही, तरीही येणाऱ्या काळात हा संघर्ष आणखी तीव्र केला जाईल, हे मात्र निश्चित.

कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या खुर्चीसाठी यापूर्वीही अनेक वेळा सत्तानाट्य पाहायला मिळाले. मात्र यावेळी आबा, काका गटातील राजकीय संघर्ष मुद्द्यावरून गुद्यावर आला. राजकीय आखाड्यात शब्दांचा राडा नवा नाही. मात्र, शब्दावरून हातघाईवर येत आबा, काका गटाने पुन्हा राडा घातला. दुसऱ्याच दिवशी यु टर्न घेत दोन्ही गटांनी त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही मारामारी येणाऱ्या काळातील रक्तरंजित राजकीय संघर्षाची नांदी ठरणार आहे.

आबा-काका घराण्यातील नवी पिढी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून आखाड्यात उतरण्याची तयारी करत आहे. दोन्ही घराण्यांच्या नव्या पिढीसाठी ही विधानसभा निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. त्यामुळे अंजनी, चिंचणीच्या दोन्ही घराण्यांनी ही लढाई आर या पारची केली आहे. मात्र, हे करत असताना जनतेच्या मूळ प्रश्नांना बगल देत, केवळ खुर्चीच्या अट्टाहासासाठी कार्यकर्ते आणि जनतेचा बळी देण्याचे काम या रक्तरंजित संघर्षातून होत आहे.

गुद्दे नकोत; मुद्दे हवेत

  • तासगाव तालुक्याला संघर्ष नवा नाही. तालुक्यातील जनतेने आबा-काका ऐक्य एक्सप्रेसही पाहिली. आर. आर. पाटील यांच्या पश्चात दोन्ही गटाच्या नेत्यांची अप्रत्यक्ष सेटलमेंटही पाहिली. दोन्ही गटांकडून संघर्षाचा ‘पुनश्च हरिओम’ केला आहे. मात्र मतदारसंघातील जनतेची गुद्दे नकोत मुद्दे हवेत, अशी भावना आहे.
  • तालुक्यातील खरीप वाया गेला आहे. द्राक्ष बागांची अवस्था त्याहीपेक्षा बिकट आहे. शेतकरी कोलमडलेला असताना, नेते जनतेच्या प्रश्नावर शासन दरबारी राडा करण्याऐवजी स्वतःच्या वर्चस्वासाठी गोंधळ घालताना दिसत आहेत. हीच गोष्ट जनतेच्या पचनी पडली नाही.

Web Title: Conflict between R. R. Patil and Sanjaykaka Patil group in Tasgaon-Kavthemahankal Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.