सांगली बाजार समितीच्या निवडणुकीवरून वसंतदादा-कदम गटांत संघर्ष

By अशोक डोंबाळे | Published: April 5, 2023 11:53 AM2023-04-05T11:53:25+5:302023-04-05T11:54:05+5:30

महाविकास आघाडीत भाजपचे खासदार कसे?

Conflict between Vasantdada-Kadam factions over Sangli Bazar Samiti elections | सांगली बाजार समितीच्या निवडणुकीवरून वसंतदादा-कदम गटांत संघर्ष

सांगली बाजार समितीच्या निवडणुकीवरून वसंतदादा-कदम गटांत संघर्ष

googlenewsNext

सांगली : सांगली बाजार समितीवर वर्चस्व मिळविण्यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी रणनीती आखली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काँग्रेसचे नेते डॉ. विश्वजित कदम यांना बरोबर घेऊन पॅनेलची तयारी केली आहे. या गटाला शह देण्यासाठी काँगेसचे नेते विशाल पाटील सरसावले असून, त्यांनी दुसऱ्या पॅनेलसाठी मोर्चेबांधणी केली आहे. यावरून काँग्रेसमध्ये पुन्हा दादा-कदम गटातील वाद उफाळला आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष पाहिला आहे. हा वाद आजही संपलेला नसून, त्यांच्या नंतरच्या पिढीतही कलगीतुरा रंगतो. मागील महिन्यात वसंतदादा साखर कारखान्याच्या प्रदूषणाचा मुद्दा जयंत पाटील यांनी विधानसभेत उपस्थित करून ते दाखवून दिले आहे. या वादाचे पडसाद सध्या बाजार समितीच्या निवडणुकीत उमटत आहेत.

वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनी जयंत पाटील यांनी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांच्यापासून फारकत घेतली आहे. याबाबतची खंत त्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जतचे आमदार विक्रम सावंत यांच्याकडे बोलून दाखवली आहे. जयंत पाटील असतील त्या पॅनेलमध्ये मी नाही, असे ते म्हणत असल्याची चर्चा आहे.

कदम गटाने विशाल पाटील यांची समजूत काढून महाआघाडीबरोबर जाण्यास आग्रह धरला आहे, पण त्यांनी तो प्रस्ताव फेटाळला आहे. विशाल पाटील यांनी भाजपचे जतचे माजी आमदार विलासराव जगताप, कवठेमहांकाळचे नेते माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्याशी आघाडी करून स्वतंत्र पॅनेलची तयारी ठेवली आहे. यामुळे काँग्रेस पक्षातील कदम आणि दादा गटांत फूट पडण्याची शक्यता आहे.

दादा गटाची शुक्रवारी बैठक

वसंतदादा गटाने शुक्रवारी (दि. ७) कार्यकर्त्यांची बैठक काँग्रेस कमिटीशेजारच्या वसंतदादा भवनात बोलावली आहे. विशाल पाटील आणि जयश्रीताई पाटील यावेयी भूमिका जाहीर करणार आहेत.

जयश्रीताईंच्या भूमिकेकडे लक्ष

जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांना आघाडीत घेण्यासाठी विश्वजित कदम, विक्रम सावंत यांनी चर्चा केली आहे. पण, जयश्रीताई यांनी अद्याप कदम की दादा गटाबरोबरच जायचे, हे जाहीर केलेले नाही. सध्या तरी त्यांची भूमिका दादा गटाबरोबरच राहण्याची दिसत आहे.

महाविकास आघाडीत भाजपचे खासदार कसे?

जिल्ह्यात महाविकास आघाडी करूनच सर्व निवडणुका लढविण्याचा निर्णय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांनी जाहीर केला आहे. पण, या महाविकास आघाडीत भाजपचे खासदार संजय पाटील कसे सहभागी आहेत? ही महाविकास आघाडी आहे का, असा सवाल काँग्रेसच्या दादाप्रेमी गटाने केला आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांची झाली बैठक

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते डॉ. विश्वजित कदम, विक्रम सावंत, भाजपचे खासदार संजय पाटील यांची सांगलीत बैठक झाली आहे. या बैठकीत बाजार समितीच्या जागा वाटपाबाबत चर्चा झाली आहे. आघाडीत आणखी कोणाला घ्यायचे याबाबत चर्चा झाल्याचे समजते.

Web Title: Conflict between Vasantdada-Kadam factions over Sangli Bazar Samiti elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.