वादग्रस्त आरक्षणाची फाईल गायब

By admin | Published: January 7, 2016 11:53 PM2016-01-07T23:53:00+5:302016-01-08T01:08:51+5:30

पदाधिकाऱ्यांची कस्टडी चर्चेत : मनसेची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

The conflicting file's file disappears | वादग्रस्त आरक्षणाची फाईल गायब

वादग्रस्त आरक्षणाची फाईल गायब

Next

सांगली : शहरातील कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणीमागील प्ले ग्राऊंडच्या जागेवरील आरक्षण उठविण्यासंदर्भातील फाईल नगररचना विभागातून गायब झाली आहे. एका पदाधिकाऱ्याच्या कस्टडीत ही फाईल असल्याचे समजते. आरक्षण उठविण्यावरून गुरुवारी महापालिकेत वादळ उठले होते. त्यातच मनसेने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत आरक्षण उठविण्यास विरोध दर्शविला आहे. काही नगरसेवकही लेखी तक्रार करण्याच्या तयारीत आहेत.
कोल्हापूर रस्त्यावर आकाशवाणीच्या मागील बाजूस दोन एकर जागेवर प्ले ग्राऊंडचे आरक्षण आहे. पूर्वी ही जागा हिरव्या पट्ट्यात होती. कालांतराने तिचा पिवळ्या पट्ट्यात समावेश झाला आहे. या जागेवर काहीजणांना गुंठेवारीअंतर्गत प्रमाणपत्रेही देण्यात आली आहेत. प्ले ग्राऊंडचे आरक्षण उठविण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. एका माजी आयुक्ताने हा प्रस्तावही मान्य केला होता. पण नंतर तो बासनात गुंडाळला होता. आता पुन्हा या जागेवरील आरक्षण उठविण्यासाठी पदाधिकारी, नगरसेवक सरसावले आहेत. त्यासाठी अर्थपूर्ण तडजोडीही झाल्या असून, दबाव गटाला हाताशी धरून हा ठराव मंजूर करण्याच्या हालचाली एका गटाकडून सुरू आहेत.
याबाबतची माहिती मिळताच गुरुवारी नगरसेवकांत खळबळ उडाली. बहुतांश नगरसेवकांनी नगररचना विभागाकडे या जागेच्या गुंठेवारीच्या प्रस्तावाची फाईल मागितली. पण नगररचना विभागाकडून फाईल देण्यास टाळाटाळ केली जात होती. स्थायी समितीचे सभापती, ज्येष्ठ नगरसेवकांनी, नेमके आरक्षण कुठले उठविले, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पण नगररचना विभागाने त्याला प्रतिसाद दिलेला नाही.
दरम्यान, मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, शहराध्यक्ष अमर पडळकर, संदीप टेंगले, याकुब मणेर, दयानंद मलपे, डॉ. संजय लवटे आदींनी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांची भेट घेऊन, आरक्षण उठविण्यास विरोध केला. सावंत म्हणाले की, महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी आरक्षण उठविण्याचा ठराव केला आहे. गुंठेवारीत राहत्या घरावर आरक्षणे आहेत. तेथील नागरिक गेली ३० ते ३५ वर्षे आरक्षणाविरोधात लढाई देत आहेत. पण त्यांच्या हिताचा ठराव होत नाही. खुल्या जागेवरील आरक्षण मात्र उठविले जात आहे. हा ठराव रद्द करावा, अन्यथा जनआंदोलन हाती घेऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)....


कागदात दडले : आरक्षण उठविल्याचे आकडे
कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणीच्या मागील सुमारे दहा एकर जागेवर प्ले ग्राऊंडचे आरक्षण आहे. त्यापैकी दोन एकर जागेवरील आरक्षण उठविल्याचे समजते. पण प्रत्यक्षात प्रस्ताव व महासभेचा ठराव अवलोकनी घेतल्यानंतरच, नेमके किती जागेवरील आरक्षण उठविण्यात आले, याचा खुलासा होईल. सध्या तरी या प्रस्तावाची फाईल पदाधिकाऱ्यांच्या कस्टडीत आहे. फाईल मिळाल्यानंतरच, दोन की दहा एकरावरील आरक्षण उठविले, याची माहिती मिळणार आहे.

Web Title: The conflicting file's file disappears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.