आष्ट्यात उड्डाणपुलास विरोध
By admin | Published: April 20, 2017 12:12 AM2017-04-20T00:12:25+5:302017-04-20T00:12:25+5:30
नगरपालिका सभा : पाणी नळास मीटर बसवणार; तिमाही पाणीपट्टी आकारणी
आष्टा : आष्टा शहरातून जाणाऱ्या पेठ-सांगली मार्गावर शासनाच्यावतीने उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे. तसेच हा रस्ता सहापदरी करण्यात येणार आहे. त्यास आष्टा पालिकेच्या मंगळवारी झालेल्या सभेत विरोध करण्यात आला.
सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा स्नेहा माळी होत्या. यावेळी मुख्याधिकारी पंकज पाटील, उपनगराध्यक्ष विशाल शिंदे व नगरसेवक उपस्थित होते.
सभेत नळास मीटर बसवून तिमाही पाणीपट्टी आकारणी करण्याचा तसेच पिवळ्या पट्ट्यातील सर्व नागरिकांना घरपट्टी लागू करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. आष्टा पालिकेच्या १६३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पालिकेची सभा पालिकेबाहेर जलसिंचन भवन येथे घेण्यात आली
पेठ-सांगली राष्ट्रीय मार्ग आष्टा शहरातून जातो. हा मार्ग सहापदरी करण्याबरोबरच येथून शैलेश सावंत, राज पेट्रोल पंप ते हॉटेल साई गार्डनपर्यंत उड्डाण पूल करण्यात येणार आहे. याचे शासनाकडून सर्वेक्षण झाले आहे, मात्र याला आष्टा पालिकेच्या सभेत विरोध करण्यात आला. तसेच विकास आराखड्यात शहराच्या बाजूने ४५ मीटर रिंग रोड आहे, त्या ठिकाणी सहापदरी रस्ता करण्यास मंजुरी देण्यात आली.
आष्टा पालिकेची पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली आहे. या योजनेच्या नळ कनेक्शननजीक मीटर बसवण्यात आली आहेत. त्याचे तीन महिन्यास रिडिंग घेऊन त्याप्रमाणे पाणीपट्टी आकारण्यात येणार आहे. त्यासाठी ठेका देण्याचा ठराव बैठकीत करण्यात आला.
शहराच्या पिवळ्या पट्ट्यात राहणाऱ्या नागरिकांना घरपट्टी लागू करण्यास मंजुरी देण्यात आली.
आष्टा शहरास मर्दवाडी येथून कृष्णा नदीवरून पाणी आणले आहे. येथील जॅकवेलच्या मुख्य जलवाहिनीस मीटर बसवण्यास मंजुरी देण्यात आली. शहराच्या उपनगर व मळे भागात पाणी पुरवठ्यासाठी पोटवाहिन्या करण्यासह विविध विषयांना मंजुरी देण्यात आली.
फिश मार्केटनजीक मोकळ्या गाळ्यात मटण मार्केट सुरू करण्यास तसेच सिद्धार्थनगर येथील जीर्ण तक्क्याच्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यास मंजुरी देण्यात आली. यासाठी अनुसूचित जाती-जमातीसाठीचा पाच टक्के निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
सोमलिंग तलावासाठी सरोवर संवर्धन योजनेतून अडीच कोटी रूपये मंजूर झाले आहेत. यापैकी ५० लाख रूपये पालिकेला मिळाले आहेत, ते काम सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली. चौदाव्या वित्त आयोगामधील ३ कोटी ७८ लाख रूपयांमधून विविध विकास कामे करण्यास मंजुरी देण्यात आली. रस्ते व गटारी साफ करण्याच्या कामासाठी ६४ लाख व कचरा गोळा करणे कामासाठी ४२ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
यावेळी मंगलादेवी शिंदे, झुंझारराव पाटील, शेरनवाब देवळे, अर्जुन माने, वीर कुदळे, विमल थोटे, पुष्पलता माळी, जगन्नाथ बसुगडे, धैर्यशील शिंदे, विजय मोरे, शैलेश सावंत, संगीता सूर्यवंशी, सारिका मदने, तेजश्री बोन्डे, वर्षा अवघडे, मनीषा जाधव, चंद्रकांत पाटील, पोपट हाबळे, एस. डी. कांबळे, आर. एन. कांबळे, संजय बागणे उपस्थित होते.