आपसातील संघर्षाने सत्तेचा गोंधळ

By admin | Published: March 8, 2016 12:04 AM2016-03-08T00:04:35+5:302016-03-08T00:52:35+5:30

महापालिकेत यादवी : मदनभाऊ गटाला शह देण्याच्या हालचाली

Conflicts of power confusion of power | आपसातील संघर्षाने सत्तेचा गोंधळ

आपसातील संघर्षाने सत्तेचा गोंधळ

Next

सांगली : महापालिकेच्या राजकारणात आतापर्यंत सत्ताधारी विरूद्ध विरोधक असा संघर्ष सांगलीकरांनी अनुभवला असेल. पण आता सत्ताधारी काँग्रेसमधीलच दोन गटात यादवीची शक्यता आहे. पालिकेत काँग्रेसची सत्ता असली तरी, सत्ताधारी मदनभाऊ पाटील यांचा गट आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसच्या एका गटाने स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करण्याबरोबरच पाटील गटाला शह देण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे नजीकच्या काळात काँग्रेस विरूद्ध काँग्रेस असा सामना रंगला, तर नवल नाही.
मदनभाऊ पाटील यांच्या निधनानंतर पालिकेतील सत्ताधारी काँग्रेसच्या चिंधड्या उडाल्या आहेत. त्याचा प्रत्यय महापौर, उपमहापौर निवडीवेळी आला. अगदी मदनभाऊ यांच्याशी एकनिष्ठ म्हणून मिरविणाऱ्या नगरसेवकांनीही त्यांच्या पश्चात बंडाचे निशाण हाती घेतले. शिवाय मदनभाऊंनी ज्यांना प्रतिष्ठा दिली, पदे दिली, ती मंडळीही आता त्यांच्याविरोधात गटा-तटाचे राजकारण करू लागली आहेत.
या साऱ्यावर मात करीत मदनभाऊ गटाने महापौर निवडीत बाजी मारली. मदनभाऊंच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांच्यावर निष्ठा असलेल्या नगरसेवकांची संख्या आजही अधिक आहे. त्यात हा गट एकसंधपणे साऱ्या आव्हानांना सामोरा जात आहे. जयश्रीताई पाटील यांच्या शब्दाखातरच हारूण शिकलगार यांची महापौरपदी निवड झाली, हेही नाकारून चालणार नाही. उपमहापौरांची निवड होताना मात्र बरेच राजकारण घडले.
महापौर, उपमहापौरांची निवड होऊन महिन्याचा कालावधी लोटला नाही तोपर्यंतच अंतर्गत धुसफूस वाढली आहे. उपमहापौरांनी स्वतंत्र बैठका घेऊन सवतासुभा मांडला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर पालिकेच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. सध्या महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती व गटनेता अशी चार संस्थाने पालिकेत आहेत. त्यापैकी महापौर व स्थायी समिती सभापती हे मदनभाऊ गटाचे मानले जातात. उपमहापौर विजय घाडगे हे माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, विशाल पाटील गटाचे आहेत. वर्षभरापूर्वी माजी महापौर विवेक कांबळे व स्थायी समितीचे माजी सभापती संजय मेेंढे यांच्यात संघर्ष उफाळला होता.
आताही तशीच परिस्थिती आहे. केवळ पदाधिकारी बदलले आहेत. भविष्यात महापौर, स्थायी समिती सभापती विरुद्ध उपमहापौर असा संघर्ष सुरू झाल्यास नवल वाटू नये. हा संघर्ष केवळ महापालिकेपुरताच मर्यादित राहणार नाही. (प्रतिनिधी)


जयश्रीतार्इंची कोंडी
महापालिकेच्या राजकारणात नवख्या असलेल्या जयश्रीताई मदन पाटील यांची राजकीय कोंडी करण्याच्या हालचाली काँग्रेसमधून सुरू आहेत. पण जयश्रीतार्इंच्या पाठीशी मदनभाऊनिष्ठ कार्यकर्त्यांची मजबूत फळी आहे. काही नगरसेवक व प्रमुख कार्यकर्त्यांना राजकीयदृष्ट्या लक्ष्य बनविण्याचा डाव आखला जात आहे. त्यामुळे भविष्यात सत्ताधारी गटावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू शकतात.

Web Title: Conflicts of power confusion of power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.