‘वसंतदादा’च्या मैदानात संघर्षाची चिन्हे

By admin | Published: April 21, 2016 11:55 PM2016-04-21T23:55:34+5:302016-04-22T00:59:49+5:30

पंचवार्षिक निवडणूक : शेतकरी संघटना लढणार, दीपक शिंदे यांच्या भूमिकेकडे लक्ष

Conflicts of struggle in 'Vasantdada' field | ‘वसंतदादा’च्या मैदानात संघर्षाची चिन्हे

‘वसंतदादा’च्या मैदानात संघर्षाची चिन्हे

Next

सांगली : येथील वसंतदादा साखर कारखान्याच्या यंदाच्या निवडणुकीत नाराज सभासदांनी शड्डू ठोकला आहे. या नाराजांना केवळ नेतृत्वाची प्रतीक्षा आहे. त्यांचे नेतृत्व करीत निवडणूक लढविण्याचा निर्धार शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केला आहे. दुसरीकडे पारंपरिक विरोध असलेले भाजपचे नेते दीपक शिंदे यांच्या भूमिकेकडेही अनेक सभासदांचे लक्ष लागले आहे.
वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम बुधवारी जाहीर झाल्यानंतर राजकीय लोकांचे लक्ष आता कारखान्यावर केंद्रित झाले आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या असलेल्या या साखर कारखान्यावर सत्ता मिळविण्याचा प्रयत्न आजवर अनेकांनी केला, मात्र प्रदीर्घ काळ वसंतदादा पाटील यांच्याच वारसदारांची सत्ता अबाधित राहिली आहे. मागील निवडणुकीत कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी निवडणूक बिनविरोध करण्यात यश मिळविले होते. शेतकरी संघटनेचा एक प्रतिनिधीही त्यांनी मंडळात घेतला होता. यंदा मात्र त्यांना विरोध करणारे अनेक नेते मैदानात उतरण्याची चिन्हे आहेत.
शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, वसंतदादा कारखान्याने शेतकऱ्यांवर एफआरपीबाबत अन्याय केला आहे. सभासदांमध्ये कारखान्याच्या व्यवस्थापनाविषयी प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे या नाराजांना घेऊन आम्ही पूर्ण पॅनेल उभे करणार आहोत. सांगली, भिलवडी, आष्टा, तासगाव आणि मिरज या पाच मतदारसंघात तासगाव वगळता अन्य चारही मतदारसंघात कमी-अधिक प्रमाणात सभासदांमध्ये ऊस बिलाच्या विलंबावरून नाराजी आहे. त्यामुळे या नाराजांचे लक्षही कारखान्याच्या निवडणुकीकडे लागले आहे.
कोणते नेते मैदानात उतरणार, यावर नाराजांची भूमिकाही ठरणार आहे. मिरज, सांगली मतदारसंघातील नाराज सभासदांचे लक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर यांच्या भूमिकेकडे लागले आहे. (प्रतिनिधी)

लवकरच निर्णय घेऊ - दीपक शिंदे
हा मोठा साखर कारखाना चांगल्या पद्धतीने चालावा, ही आमची भूमिका आहे. मिरज पूर्वभागातील अर्थकारण या कारखान्यावर अवलंबून आहे. त्याचबरोबर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरीही या कारखान्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे या कारखान्याची निवडणूक लढविण्याबाबत आमचा विचार सुरू आहे. अद्याप कोणतीही निश्चित भूमिका ठरलेली नाही. खासदार संजय पाटील व अन्य नेत्यांशी याबाबत चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल, असे मत भाजपचे नेते दीपक शिंदे-म्हैसाळकर यांनी व्यक्त केले.

चर्चेनंतर भूमिका - दिनकर पाटील
वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याची निवडणूक लढविण्याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. तरीसुद्धा पक्षीय व समविचारी नेत्यांशी चर्चा करून आम्ही याबाबतचा निर्णय घेऊ, असे माजी आमदार दिनकर पाटील यांनी सांगितले.

बिनविरोधसाठी प्रयत्न
एकीकडे अनेक राजकीय विरोधक कारखान्याची निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न करीत असताना, अध्यक्ष विशाल पाटील यांनी बिनविरोधसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. गतवेळचा ‘फॉर्म्युला’ ते अंगिकारण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Conflicts of struggle in 'Vasantdada' field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.