इस्लामपूर पालिका सभेत विकास कामावरून पुन्हा वादंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2021 01:12 PM2021-12-10T13:12:19+5:302021-12-10T13:12:46+5:30

आजच्या सभेवेळीही सभागृहाबाहेर पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. विकास कामावरुन आरोप करत डोक्याला काळ्या फिती बांधून विकास आघाडी-शिवसेनेच्या सदस्यांनी सभात्याग केला.

Confusion again over development work in Islampur Municipal Council | इस्लामपूर पालिका सभेत विकास कामावरून पुन्हा वादंग

इस्लामपूर पालिका सभेत विकास कामावरून पुन्हा वादंग

Next

इस्लामपूर : शहरातील ३ कोटी ५० लाख रुपयांच्या विकास कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी देऊनही त्याच्या निविदा का काढल्या जात नाहीत. कुणाच्या सांगण्यावरून ही कामे थांबवली जात आहेत. प्रशासन किती दिवस टाळाटाळ करणार असा आरोप करत डोक्याला काळ्या फिती बांधून विकास आघाडी-शिवसेनेच्या सदस्यांनी सभात्याग केला. मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या मारला. याचवेळी राष्ट्रवादी सदस्यांनी अपयशी सत्ताधाऱ्यांचा निषेधाच्या घोषणा दिल्याने वातावरण तणावपूर्ण बनले.

पालिका सभागृहात नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्या उपस्थितीत मागील तहकूब विशेष सभा झाली. यावेळी पुन्हा विषय पत्रिकेवरील कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी गोंधळाला सुरुवात झाली. राष्ट्रवादीच्या आनंदराव मलगुंडे यांनी ३ कोटी २५ लाखांच्या कामाच्या निविदा काढा अशी मागणी केली. त्यावर बांधकाम अभियंत्यांनी त्याला होकार दिला. हाच धागा पकडत विकास आघाडीच्या विक्रम पाटील यांनी पुन्हा प्रशासनाच्या वेळकाढू धोरणावर हल्ला चढवला. गुंठेवारी, अकृषक प्रमाणपत्र आणि मालमत्ता हस्तांतरण ही कामे का बंद आहेत. नागरिकांना आम्ही काय सांगायचे. भुयारी गटार काम सुरू करण्याबाबत सरकारी वकिलांचा अभिप्राय आला का अशा प्रश्नाची सरबत्ती केली.

त्यात राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सभा पिठासमोर धाव घेत विषय पत्रिकेवरील विषयावर बोला. तुमचे ऐकून घ्यायला आलो नाही असा प्रतिवाद केला. यावेळी पुन्हा गदारोळाला सुरुवात झाली. सत्ताधारी सदस्यांनी डोक्याला काळ्या फिती बांधून प्रशासनाचा निषेध करत सभात्याग केला. त्याचवेळी राष्ट्रवादीने अपयशी सत्ताधाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्याने तणाव निर्माण झाला. आजच्या सभेवेळीही सभागृहाबाहेर पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

मुख्याधिकारी दालनासमोर ठिय्या मारलेल्या विकास आघाडी आणि शिवसेना सदस्यांनी विकास कामे सुरू करण्याची मागणी केली. तसेच कामे सुरू करण्यास विलंब करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

Web Title: Confusion again over development work in Islampur Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.