शेट्टी-खोत यांच्या भूमिकेवर कार्यकर्त्यांत संशयाचे धुके, संघटनेच्या अस्तित्वाचा प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 05:37 PM2022-03-02T17:37:14+5:302022-03-02T17:38:56+5:30
जयंत पाटील आणि शेट्टी यांच्यात दरी निर्माण झाली आहे. याचाच फायदा सदाभाऊ खोत उठविण्याचा प्रयत्न करत आहेत.
अशोक पाटील
इस्लामपूर : गत लोकसभा निवडणुकीपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था निर्माण होऊ लागली आहे. सध्या रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनीही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी जवळीक साधली आहे. त्यामुळे खोत व शेट्टी यांच्या भूमिकेवर कार्यकर्त्यांमध्ये संशय निर्माण होऊ लागला आहे.
मागील लोकसभा निवडणूक हातकणंगले लोकसभा मतदारसंघ राजू शेट्टी यांनी साखरसम्राटांचे नेते जयंत पाटील यांच्याशी समझौता करून लढविली होती. त्यानंतर महाआघाडीशी सलोख्याचे संबंध निर्माण केले होते. त्यामुळे विधान परिषदेत राष्ट्रवादीच्या कोट्यातून एकनाथ खडसे आणि राजू शेट्टी यांना आमदारकी मिळणार होती. परंतु, राज्यपालांनी यादीकडे शेवटपर्यंत टाळाटाळ केल्याने आमदारकी गळ्यात पडू शकली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या शेट्टी यांनी आपली भूमिका बदलत ऐन ऊस हंगामात एफआरपीच्या विषयावरून सरकारविरोधातच आघाडी उघडली. त्यातही त्यांना पूर्णत: यश मिळाले नाही.
सरकारने एफआरपीचे दोन तुकडे केल्याने शेट्टी तोंडघशी पडले. यावरही त्यांनी आपली भूमिका मवाळ केली. सध्या विजेच्या प्रश्नावर आक्रमक झाले आहेत. यामुळेच आता जयंत पाटील आणि शेट्टी यांच्यात दरी निर्माण झाली आहे. याचाच फायदा सदाभाऊ खोत उठविण्याचा प्रयत्न करत आहेत. इस्लामपूर येथील पालिकेच्या प्रशासकीय कार्यक्रमात जयंत पाटील व खोत एकत्र आल्याचे इस्लामपुरकरांनी पाहिले. दोघांनी परस्परांची वारेमाप स्तुती केली. गेल्या पाच वर्षांत सदाभाऊंनी स्वत:च्याच नेतृत्वाखालील पालिकेतील तत्कालीन सत्ताधारी विकास आघाडीच्या कामाचा जाहीर पंचनामा केला. जयंत पाटील यांच्या साक्षीने बोभाटे काढले. एकंदरीत, जयंत पाटील व सदाभाऊ यांची वाढती जवळीक आणि शेट्टी यांच्याशी दुरावा या दुटप्पी भूमिकेवर कार्यकर्त्यांत मात्र संशयाचे धुके निर्माण झाले आहे.
आमची जवळीक पूर्वीपासूनची
जयंत पाटील आणि माझी जवळीक पूर्वीपासून आहे. राजारामबापू पाटील यांच्या आशीर्वादासह आमचे घराणे यापूर्वी कार्यरत होते. मरळनाथपूर येथे दूध संस्था सुरू केली होती. जनता पक्षात गेल्यानंतर त्यांच्याच विचाराने आम्ही राजकीय वाटचाल केली होती. सध्या जयंत पाटील व आमची विचारधारा पूर्णत: वेगळी आहे. त्यामुळे जवळ आलो म्हणून बिघडले कोठे, त्यांच्याशी लगेच हातमिळवणी केली असा अर्थ काढू नये.