सांगलीत मतदान केंद्रावर गोंधळ,विज्ञान मानेवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 03:27 PM2024-05-11T15:27:50+5:302024-05-11T15:28:15+5:30
सांगली : लोकसभा निवडणुकीत मालू हायस्कूलवरील केंद्रावर मतदानावेळी बोगस मतदानाचा आरोप करून गोंधळ घालणाऱ्या विज्ञान माने आणि कविता मिलिंद ...
सांगली : लोकसभा निवडणुकीत मालू हायस्कूलवरील केंद्रावर मतदानावेळी बोगस मतदानाचा आरोप करून गोंधळ घालणाऱ्या विज्ञान माने आणि कविता मिलिंद वाले (रा. स्फूर्ती चौक, सांगली) यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी कर्मचारी नारायण रंगराव यादव यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नारायण यादव हे मालू हायस्कूल येथील मतदान केंद्रात शासकीय कर्तव्य पार पाडत होते. यावेळी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संशयित महिला कविता वाले आणि सोबत आलेल्या विज्ञान माने याने परवानगीशिवाय मतदान केंद्रात जाऊन महिला कविता वाले यांचे बोगस मतदान कसे काय झाले? याबाबत कर्मचारी यादव आणि इतरांना जाब विचारला. हुज्जत घालून मतदान केंद्रावर आरडाओरडा करून, गैरशिस्तीचे वर्तन केले.
निवडणुकीचे कामकाज खुल्या वातावरणात होण्यास अडथळा निर्माण करून फिर्यादी यादव यांनी दोघांना मतदान केंद्राबाहेर जाण्याचा आदेश दिला असताना आदेश न पाळता शासकीय कर्तव्यास अडथळा निर्माण केल्याची फिर्याद यादव यांनी दिली. त्यावरून विज्ञान माने, कविता वाले यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.