बँकांच्या निकालपत्राचा गोंधळ
By Admin | Published: January 21, 2015 12:19 AM2015-01-21T00:19:51+5:302015-01-21T00:21:14+5:30
प्रतीक्षा कायम : वसंतदादा, जिल्हा बँक चौकशीचे घोडे अडले
सांगली : ‘वसंतदादा’ तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चौकशीचा मार्ग खुला करण्याचा निर्णय सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या बुधवारी घेतला होता. मात्र निकालपत्राची प्रतच अद्याप सहकार विभागाला मिळाली नाही. त्यामुळे या दोन्ही बँकांच्या चौकशीचे घोडे अडले आहे. दुसरीकडे ही प्रत न मिळाल्याने, न्यायालयात जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन्ही बँकांच्या माजी संचालकांचीही अडचण झाली आहे. वसंतदादा शेतकरी सहकारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कलम ८८ च्या चौकशीचा मार्ग आठवड्यापूर्वी सहकारमंत्र्यांनी खुला केला. चौकशीविरोधात माजी संचालकांनी सुनावणीवेळी म्हणणे मांडले होते. माजी संचालकांची मागणी अमान्य करीत दोन्ही बँकांची चौकशी पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या बुधवारी हा निर्णय झाला होता. पण एक आठवडा झाला तरी या निकालपत्राची प्रत अद्याप सहकार विभाग, बँक प्रशासक किंवा तत्कालीन संचालकांना मिळालेली नाही. त्यामुळे निकालपत्राला होत असलेल्या विलंबामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. निकालपत्र केव्हा येणार, याची माहिती कोणालाही नाही. वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेचे ११ जानेवारी २००८ रोजी विशेष लेखापरीक्षण झाले होते. या लेखापरीक्षणात अनेक आक्षेप नोंदविण्यात आले. याच लेखापरीक्षणाच्या आधारे ४ जुलै २००८ रोजी महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० मधील कलम ८८ नुसार चौकशीचे आदेश देण्यात आले. चौकशी सुरू झाल्यानंतर तत्कालीन सहकारमंत्र्यांनी यास स्थगिती दिली होती. यावर नव्या सहकारमंत्र्यांच्या उपस्थितीत सुनावणी झाली. माजी संचालकांचे लेखी म्हणणे प्राप्त झाल्यानंतर या चौकशीवरील स्थगिती उठविण्यात आली. या चौकशीत, २१ संस्थांना नियमबाह्य कर्जवाटप करुन नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. (प्रतिनिधी)