मिरजेतील मृत्यूनोंदणी प्रक्रियेत गोेंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:18 AM2021-07-16T04:18:47+5:302021-07-16T04:18:47+5:30
सांगली : नागरिकांना तातडीने व घरबसल्या जन्म-मृत्यूचे दाखले मिळावेत म्हणून ऑनलाइन सेवा सुरू केली असली तरी दप्तरदिरंगाईमुळे या योजनेचा ...
सांगली : नागरिकांना तातडीने व घरबसल्या जन्म-मृत्यूचे दाखले मिळावेत म्हणून ऑनलाइन सेवा सुरू केली असली तरी दप्तरदिरंगाईमुळे या योजनेचा फज्जा उडाला आहे. दीड महिना ऑनलाइन नोंदी होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना आता ऑनलाइन सेवेसाठीही ताटकळत राहावे लागत आहे.
नियमानुसार २७ ते २८ दिवसांमध्ये रुग्णालयांनी त्यांच्याकडील मृत्यूवार्ता महापालिकेला द्यायला हवी. त्यानंतर महापालिकेच्या विभागाने तातडीने त्याच्या नोंदी करून त्या ऑनलाईन उपलब्ध करायला हव्यात. ऑनलाइन नोंदीसाठी मिरजेत आता दीड महिना प्रतीक्षा करावी लागत आहे. नोंदीची माहिती घेण्यासाठी गेलेल्या नातेवाइकांना रुग्णालयांकडून माहिती मिळाली नसल्याचे सांगण्यात येते. रुग्णालयात चौकशी केल्यानंतर माहिती दिल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे नागरिकांचे महापालिका ते रुग्णालय, असे हेलपाटे सुरू आहेत.
महापालिका व रुग्णालयांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे मृतांच्या नातेवाइकांचे हाल सुरू आहेत. ऑनलाइन दाखला मिळविण्यासाठीही त्यांना त्रास होऊ लागला आहे. ही जलद सेवा आहे की मंदगती कारभार, असा सवाल आता उपस्थित होत आहे. कोरोनामध्ये अचानक मृत्यू झालेल्या व्यक्तीची बँक, मालमत्तेबाबतची कामे करण्यासाठी मृत्यू दाखला सर्वांत महत्त्वाचा असतो. मात्र, या दाखल्यासाठी मृतांच्या नातेवाइकांना यातना भोगाव्या लागत आहेत. या यंत्रणेवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसत आहे.
चौकट
अधिकाऱ्यांनाही अंदाज नाही
मिरजेतील या विभागाचे प्रमुख दिलीप घोरपडे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता ते म्हणाले की, महिनाभरात रुग्णालयांकडून माहिती यायला हवी. कुठे विलंब होत आहे, याची माहिती घेऊ.