सांगलीत पहिल्याच क्षेत्रसभेत गोंधळ
By Admin | Published: January 10, 2017 11:33 PM2017-01-10T23:33:36+5:302017-01-10T23:33:36+5:30
नियोजन ढासळले : नागरिकांचा प्रश्नांचा भडीमार, प्रशासन निरूत्तर, सभा गुंडाळली
कुपवाड : महापालिकेच्यावतीने मंगळवारी शहरातील प्रभाग क्रमांक पाचमध्ये घेण्यात आलेल्या पहिल्याच क्षेत्रसभेत प्रशासनावर संतप्त नागरिकांनी प्रश्नांचा भडीमार केला. त्यापुढे अधिकारी निरूत्तर बनले, त्यातच योग्य नियोजन नसल्याने सभेत गोंधळ उडाला. कोणत्याही ठोस उपाय योजनांअभावी प्रशासनाला सभा गुंडाळावी लागली.
महापालिका प्रशासनाच्यावतीने कुपवाडच्या यशवंतनगर परिसरातील आंबा चौकामध्ये पहिलीच क्षेत्रसभा घेण्यात आली. महापालिकेच्या स्थापनेपासून कायद्यात तरतूद असूनही ही सभा झाली नव्हती. सुधार समितीने यासाठी सतत पाठपुरावा केला होता. प्रशासनाच्या निर्णयानंतर उपमहापौर विजय घाडगे व नगरसेविका निर्मला जगदाळे यांनी मागणी करून ही सभा प्रभाग पाचमध्ये प्रथम घेतली. या सभेत सुविधेअभावी संतप्त बनलेल्या नागरिकांनी सभेच्या सुरुवातीपासूनच महापालिका प्रशासन आणि नगरसेवकांवर प्रश्नांचा भडीमार केला. ड्रेनेज, रस्ते, गटारी, औषध फवारणी, स्वच्छता, दिवाबत्ती, मोकाट जनावरे, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा याविषयीच्या समस्यांचा पाऊसच या क्षेत्रसभेत पडला.
यावेळी उपमहापौर विजय घाडगे म्हणाले की, शहराला पूर्वी अशुध्द पाण्याचा पुरवठा होत होता. आता विशेष लक्ष केंद्रीत करून शहराला चांगला पाणीपुरवठा सुरू केला आहे. प्रस्तावित ड्रेनेज योजनेसाठी प्रयत्नशील आहे. यापूर्वी विकासकामे केली आहेत. येत्या दीड वर्षात उर्वरीत कामे करू.
नगरसेविका निर्मला जगदाळे म्हणाल्या की, प्रभागात नागरिकांच्या मागणीनुसार विकासकामे केली आहेत. यापुढेही विशेष प्रयत्न करून कामे केली जातील.
नागरिकांनी घरपट्टी व पाणीपट्टीची बिले वेळेवर भरण्याची मागणी उपायुक्त सुनील पवार यांनी केली. महापालिकेच्या कुवतीनुसार नागरिकांच्या समस्यांचा निपटारा करण्याविषयी आश्वासन त्यांनी दिले. सुधार समितीचे कुपवाड शहराध्यक्ष डॉ. विशाल मगदूम यांनी शहरातील मुख्य रस्त्याची दुरूस्ती आणि पॅचवर्ककडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल धारेवर धरले. वसंतदादा सूतगिरणीलगत होत असलेल्या कुंपणाजवळून रामकृष्णनगरसाठी रस्ता तयार करण्याची मागणी त्यांनी केली. वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन चोपडे यांनी महापालिकेत स्वच्छता कामगारांची भरती करण्याची मागणी केली.
गुंठेवारी समितीचे चंदन चव्हाण यांनी इंदिरानगरमध्ये नियमितीकरणाचे दाखले देण्याची मागणी केली. उद्योजक अरविंद सकट, पूजा मुंगळे, संगीता नाईक, काँग्रेसचे सरचिटणीस अरुण रूपनर, कमल गतारे, शांताराम मोरे, आनंदराव वाघमोडे व राष्ट्रवादीचे परवेझ मुलाणी यांनीही समस्या मांडल्या.
नागरिकांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी उठलेल्या सहायक आयुक्त स्रेहलता कुंभार यांनी ठोस उत्तरे न देताच सभा गुंडाळली. नागरिकांच्या तक्रारीची नोंद घेऊन त्या कामाचा निपटारा करण्यावर भर दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र त्यामुळे नागरिकांनी त्यांच्यासमोरच नाराजी व्यक्त करत एकच गोंधळ घातला.
सभेस सर्वोदय साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार, नगरसेवक शेखर माने, गजानन मगदूम, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, राजेंद्र जगदाळे, सुरेखा कांबळे, संगीता खोत, सुभाष सरगर, रवींद्र ताटे, अमर चव्हाण, सुभाष गडदे, सुनील पांडेकर, अनिल धायगुडे, संगीता मोरे, रेखा जाधव, सारिका शिंदे, राजाराम शेंडगे, मनोज पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)ं
पहिलीच सभा : पदाधिकाऱ्यांची दांडी
महापालिकेच्या पहिल्याच क्षेत्रसभेला महापौर हारुण शिकलगार, आयुक्त रवींद्र खेबूडकर आणि स्थायी समितीच्या सभापती संगीता हारगे यांनी दांडी मारली. त्यामुळे घटनास्थळी गैरहजेरीची चर्चा रंगली होती. नागरिकांनी जबाबदार अधिकारी व पदाधिकारी उपस्थित नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
सुधार समितीच्या मागणीला यश
शहर सुधार समितीचे अमित शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या कायद्यातील तरतुदीनुसार क्षेत्रसभा घेण्याबाबत आक्रमक धोरण अवलंबले होते. त्यांच्या रेट्यामुळे महापालिकेला सभा घ्यावी लागली. उपमहापौर गटानेही पुढाकार घेऊन आपल्या प्रभागातून सभेची सुरुवात केली. या निर्णयाचे नागरिकांनी सभेत कौतुक केले.