वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकातही गोंधळ; पहिल्या फेरीची चूक दुरुस्त, दुसऱ्या फेरीतील कायम

By अविनाश कोळी | Published: July 30, 2024 11:58 PM2024-07-30T23:58:13+5:302024-07-30T23:58:26+5:30

सऱ्या फेरीतील चूक तशीच राहिल्याने मंगळवारी विद्यार्थी गोंधळून गेले.

Confusion in the schedule of medical admission process as well | वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकातही गोंधळ; पहिल्या फेरीची चूक दुरुस्त, दुसऱ्या फेरीतील कायम

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकातही गोंधळ; पहिल्या फेरीची चूक दुरुस्त, दुसऱ्या फेरीतील कायम

लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : नीट परीक्षेतील गोंधळाचा अध्याय कायम असतानाच आता प्रवेश प्रक्रियेतही गोंधळाच्या कहाण्या सुरू झाल्या आहेत. वैद्यकीय समुपदेशन समिती (मेडिकल काउन्सिलिंग कमिटी) मार्फत जाहीर केलेल्या प्रवेश फेऱ्यांच्या वेळापत्रकात नोंदणीच्या मुदतीपूर्वीच पसंतीक्रम लॉक (चॉइस लॉकिंग)ची मुदत दिली गेल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. पहिल्या फेरीतील चूक समितीने दुरुस्त केली, मात्र दुसऱ्या फेरीतील चूक तशीच राहिल्याने मंगळवारी विद्यार्थी गोंधळून गेले.

प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार १४ ऑगस्ट ते २० ऑक्टोबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. यात फेरीनिहाय तारखा जाहीर केल्या आहेत. सोमवारी वेळापत्रक जाहीर केल्यानंतर पहिल्या फेरीमध्ये पसंतीक्रम लॉकची मुदत नोंदणीपूर्वीची दिली होती. त्यामुळे गोंधळ उडाला. नोंदणी २१ ऑगस्टपर्यंत होती, मात्र पसंतीची मुदत (चॉइस लॉकिंग) २० ऑगस्टपर्यंत दिली गेली. चूक लक्षात येताच दुरुस्ती करून नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. मात्र, या वेळापत्रकात दुसऱ्या फेरीतील तशीच चूक केली गेली. नोंदणी व पैसे भरण्याची मुदत ५ ते १० सप्टेंबर अशी आहे. चॉइस लॉकिंग ६ सप्टेंबरला होणार आहे. म्हणजेच ७ तारखेनंतर जी मुले नोंदणी करतील त्यांनी चॉइस फिलिंग कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. रात्री उशिरापर्यंत समितीने याबाबतची दुरुस्ती केली नव्हती. त्यामुळे हा गोंधळ अद्याप कायम आहे.
चौकट

ऑल इंडिया कोट्यातून प्रवेश
ऑल इंडिया कोट्यातून दिल्या जाणाऱ्या प्रवेशाची ही प्रक्रिया ऑगस्टमध्ये सुरू होणार आहे. एम.बी.बी.एस., बी.डी.एस. व बी.एससी नर्सिंगसाठी प्रवेश निश्चित केले जाणार आहेत.

‘नीट’ परीक्षेत इतका मोठा सावळा गोंधळ झाला असताना आता ‘एमसीसी’सारख्या संस्थेकडून अशा चुका अपेक्षित नाहीत. लाखो विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेकडे लक्ष ठेवून असताना प्रक्रियेच्या वेळापत्रकातील चुकांमुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडत आहे. प्रत्येक प्रक्रिया काळजीपूर्वक राबविणे आवश्यक आहे.
- डॉ. परवेज नाईकवाडे, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया समुपदेशक

Web Title: Confusion in the schedule of medical admission process as well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली