मिरजेच्या लसीकरण केंद्रावर कोव्हॅक्सिनच्या बुकिंगवरून गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:30 AM2021-09-24T04:30:39+5:302021-09-24T04:30:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोव्हॅक्सिन लस घेण्याची इच्छा असलेल्या सांगली, मिरजेतील अनेक नागरिकांनी मिरजेच्या इंदिरानगर आरोग्य केंद्राचे ऑनलाईन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोव्हॅक्सिन लस घेण्याची इच्छा असलेल्या सांगली, मिरजेतील अनेक नागरिकांनी मिरजेच्या इंदिरानगर आरोग्य केंद्राचे ऑनलाईन बुकिंग केले. प्रत्यक्षात लस घेण्यासाठी गेल्यानंतर, येथील कर्मचाऱ्यांनी त्यांना कोव्हॅक्सिन लसच नसल्याचे सांगितले. त्यामुळे गुरुवारी सकाळी दीड तास या केंद्रावर गोंधळ सुरू होता.
सध्या लसीकरणाची मोहीम जोरात सुरू आहे. ऑनलाईन बुकिंग करून ऐनवेळी होणारी गैरसोय व वेळेचा अपव्यय टाळण्याकडे लोकांचा अधिक कल आहे. नोकरदारांसाठी ऑनलाईन बुकिंग सोयीचे ठरत आहे. लस निवडण्याचे पर्यायही आता नागरिकांना उपलब्ध केले आहेत. जिल्ह्यात सध्या कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या लसी उपलब्ध आहेत. त्यात कोव्हॅक्सिन कमी प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र, त्यास मागणी अधिक आहे.
मिरजेच्या इंदिरानगर आरोग्य केंद्राच्या नावापुढे कोव्हॅक्सिन लसीची ऑनलाईन उपलब्धता दर्शविण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांत बुकिंगही झाले. सुमारे २५ नागरिक गुरुवारी या केंद्रावर बुकिंगची चिठ्ठी घेऊन आले, मात्र येथील कर्मचाऱ्यांनी कोव्हॅक्सिन उपलब्धच नसल्याचे सांगितले. त्यावरून वादावादी सुरू झाली. हा वाद सुरू असेपर्यंतही या केंद्रावर ऑनलाईन कोव्हॅक्सिन लसीची उपलब्धता दाखविली जात होती. नागरिकांनी लस उपलब्ध नसल्यास पुढील दिवसांचे बुकिंग करून देण्यास सांगितले. त्यावेळी हा तांत्रिक दोष असल्याची माहिती देण्यात आली. शेवटी दीड तासानंतर कोव्हॅक्सिनचे बुकिंग करून आलेल्या नागरिकांना हताशपणे परतावे लागले. केंद्रावर आलेल्या आशुतोष यादव, निखिल पडियार, शरद काटे यांनी नाराजी व्यक्त केली.
कोट
तांत्रिक दोष असला, तरी नागरिकांना त्याचा त्रास कशासाठी? हे दोष दुरुस्त करता येत नाहीत का? येथील कर्मचाऱ्यांनी लोकांना खंडेराजुरी, बेळंकीचा पर्याय दिला, म्हणजे आम्ही हेलपाटेच मारायचे का?
- राहुल पाटील, नागरिक