परजिल्ह्यातील कोरोना मृत्यूच्या नोंदीने पोर्टलवर गोंधळात गोंधळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:27 AM2021-05-20T04:27:54+5:302021-05-20T04:27:54+5:30

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांसह शेजारच्या कर्नाटकासह परजिल्ह्यातील रुग्णही मोठ्या संख्येने जिल्ह्यात दाखल होत आहेत. दररोज किमान ८० ते १०० ...

Confusion on the portal with the death record of Corona in the district! | परजिल्ह्यातील कोरोना मृत्यूच्या नोंदीने पोर्टलवर गोंधळात गोंधळ!

परजिल्ह्यातील कोरोना मृत्यूच्या नोंदीने पोर्टलवर गोंधळात गोंधळ!

Next

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांसह शेजारच्या कर्नाटकासह परजिल्ह्यातील रुग्णही मोठ्या संख्येने जिल्ह्यात दाखल होत आहेत. दररोज किमान ८० ते १०० नवे रुग्ण उपचारासाठी दाखल होतात तर त्यातील सरासरी १० ते १२ जणांचा मृत्यू होत असल्याने त्याची नोंद जिल्ह्यातील मृत्यू यादीत होत असल्याने प्रत्यक्षातील जिल्ह्यातील मृत्यू व पोर्टलवरील नोंदी यात मोठी तफावत आढळत आहे. पोर्टल काम करणाऱ्या यंत्रणेने याचे ‘अपडेट’ न केल्याने आरोग्य विभागाला दररोज स्वतंत्र माहिती पुण्याला पाठवावी लागत आहे.

सर्व स्तरावर कोरोना माहिती अद्ययावत करण्यासाठी पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यातील एकूण कोरोनास्थिती आणि पोर्टलवरील आकडेवारी यात साम्यता होती. आता मात्र, पोर्टलचे अद्ययावतीकरण आठवड्यातून एकदा करण्यात येत असल्याने जिल्ह्यातील प्रत्यक्षातील मृत्यू व पोर्टलवरील आकडे यात तफावत आढळत आहे. आठवड्याला सरासरी १२० ते १५० जादा मृत्यूची नोंद होत आहे.

जिल्ह्यात कर्नाटकासह परजिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. यातील मृत्यू झाल्यास ते जिल्हा पोर्टलवरच नोंद होते. याबाबत जिल्हा आरोग्य यंत्रणेने पुणे कार्यालयास माहिती दिल्यानंतर, आठवड्याच्या फरकाने ज्या त्या जिल्ह्याच्या पोर्टलवर कोरोना मृत्यूची नोंद होते मात्र, त्याचे अपडेटच होत नसल्याने गोंधळ कायम आहे.

चौकट

मृत्यू नोंदणीसाठी यंत्रणा

जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात उपचार घेताना झालेल्या रुग्णांच्या मृत्यूची नोंद घेण्यासाठी कोरोना नियंत्रण कक्षात यंत्रणा कार्यन्वित करण्यात आली आहे. याठिकाणी दिवसभर माहिती घेण्यात येऊन ती संध्याकाळी पोर्टलवर अपलोड केली जाते. महापालिका क्षेत्रातील नोंदणीसाठी त्यांची स्वतंत्र यंत्रणा असलीतरी एकाच ठिकाणाहून त्याची नोंदणी होते.

चौकट

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महापालिका क्षेत्रासह वाळवा तालुक्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. खानापूर तालुक्यातील मृत्यूसंख्येतही वाढ असून यावेळी प्रथमच ग्रामीण भागातील मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.

चौकट

या अडचणी येऊ शकतात

पोर्टलवरील कोरोना मृतांची संख्या आणि प्रत्यक्ष जिल्ह्यातील मृतांची संख्या यातील तफावत अद्याप तरी कायम आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतात. दररोज किमान १० ते १२ जादा मृत्यूची नोंद जिल्ह्यात झाल्याने उपाययोजना, त्यावरील तरतुदी याबाबत अडचणी येणार आहेत. त्यामुळे पोर्टलनेच आता अधिक अद्ययावत झाल्यास भविष्यात येणाऱ्या अडचणी टाळता येऊ शकतात.

कोट

सांगली जिल्ह्यात परराज्य व परजिल्ह्यातील रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्यांची नोंदणी जिल्हा पोर्टलवर होत असल्याने ही तफावत आढळून येत आहे. ही बाब वरिष्ठ स्तरावर निर्दशनास आणून देण्यात आली आहे. प्रत्यक्षातील कोरोना मृत्यू व पोर्टलवरील संख्या हे एकच यावेत यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

Web Title: Confusion on the portal with the death record of Corona in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.