सदाभाऊंच्या हाती रयत क्रांतीचा की भाजपचा झेंडा?, कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 02:16 PM2021-12-20T14:16:56+5:302021-12-20T14:17:42+5:30
आमदार सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत यांनी रयत क्रांती पक्षाची स्थापना केली आहे. आगामी राजकारणात खोत पिता-पुत्राची नेमकी भूमिका काय? याबद्दल कार्यकर्त्यांत संभ्रम आहे.
अशोक पाटील
इस्लामपूर : रयत क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी मंत्री भाजप पुरस्कृत आमदार सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत यांनी रयत क्रांती पक्षाची स्थापना केली आहे. आगामी राजकारणात खोत पिता-पुत्राची नेमकी भूमिका काय? याबद्दल कार्यकर्त्यांत संभ्रम आहे.
'राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत एकच गट्टी' या घोषणेला भाजपने तडा देत खोत यांना पक्षाकडे खेचले. मागील जिल्हा परिषद निवडणुकीत बागणी जिल्हा परिषद मतदार संघातून सागर खोत यांची उमेदवारीने घराणेशाहीचा मुद्दा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत चव्हाट्यावर आला. त्यामुळेच शेट्टी-खोत यांच्यामध्ये दरी पडली.
त्यानंतर सदाभाऊ खोत यांनी कोल्हापुरात रयत क्रांती शेतकरी संघटनेचा झेंडा फडकविला. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप पक्षाशी हातमिळवणी केली तर राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी आणि कॉँग्रेस पक्षाची पाठराखण केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना बॅकफूटवर गेली. आता संघटनेला पुन्हा उभारी येण्यासाठी राजू शेट्टी यांचे प्रयत्न सुरू आहेत तर सदाभाऊ खोत आजही रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या झेंड्याखाली असले तरी भाजपला धरून आहेत.
सागर खोत यांनी भाजप पक्षाशी हरकत घेतली असली तरी पक्षाशी सलोखा कायम ठेवत रयत क्रांती पक्षाची स्थापना केली. या माध्यमातून राजकारण समाजकारण करण्यासाठी राज्यात पक्ष बांधणी करण्याचा विचार आहे. एकंदरीत आगामी काळात नवीन पक्ष स्थापन करून कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणे खोत यांच्यापुढे मोठे आव्हान आहे हे मात्र निश्चित.
सदाभाऊ खोत हे रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेतृत्व करणार आहेत तर माझ्याकडे रयत क्रांती पक्षाची जबाबदारी आहे. परंतु घटक पक्ष म्हणून आम्ही भाजप बरोबर राहणार आहे. गेले दोन वर्षांपासून भाजप पक्ष संघटनेत कार्यरत नाही. -सागर खोत अध्यक्ष, रयत क्रांती पक्ष, महाराष्ट्र राज्य