टोलच्या प्रश्नात भूमिकेचा गोंधळ...
By Admin | Published: March 22, 2016 12:48 AM2016-03-22T00:48:16+5:302016-03-22T00:57:30+5:30
आंदोलकांमध्ये संभ्रम : मंत्र्यांच्या आश्वासनानंतर काहींचा विरोध मावळला; काहींचा संताप कायम
सांगली : टोलच्या प्रश्नावरून सांगलीत पडलेली आंदोलनाची ठिणगी आता संभ्रमाच्या धगीने धुमसत आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी टोल सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करताना सर्वसामान्य वाहनधारकांना टोलमाफी दिली जाणार असल्याची भूमिका मांडली. यावरून समितीमधील सदस्यांच्या भूमिकेचा गोंधळ रविवारी पाहावयास मिळाला. महापौरांसह काहींनी आंदोलनाची भाषा बंद केली आहे, तर विरोधी पक्षांचे पदाधिकारी तसेच यात भरडले जाणारे वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी आंदोलनाबाबत ठाम आहेत.
सांगली-कोल्हापूर स्त्यावरील टोल वसुलीस शासनाने हिरवा कंदिल दर्शविला आहे. यावरून सध्या सांगलीत संताप व्यक्त होत आहे. काम पूर्ण होण्यापूर्वीच, तसेच कमी अंतराच्या रस्त्याला टोल लावला जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. याबाबत आंदोलनाची तयारी सुरू असतानाच सार्वजनिक बांधकाममंत्री तसेच सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आंदोलनातील हवा काढून घेतली. छोट्या वाहनांना टोल माफीची भूमिका स्पष्ट केल्यामुळे आंदोलकांमध्ये फूट पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
सोमवारी महापौरांनी विरोधाला विरोध म्हणून टोलप्रश्नी भूमिका स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र मोठ्या वाहनांना तसेच मालवाहतुकीला टोल बसणार असल्याने, त्याचे अप्रत्यक्ष परिणाम सांगलीच्या बाजारपेठेवर होणार आहेत. त्यामुळे अन्य पक्षांचे पदाधिकारी व वाहतूकदार संघटनेची नाराजी टोलच्या प्रश्नावर कायम आहे. (प्रतिनिधी)
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या घोषणा...
मार्गाचे ९५ टक्के काम पूर्ण झाल्याशिवाय टोलला परवानगी दिली जाणार नाही.
रस्त्याच्या कामांचा दर्जा त्रयस्थ विभागामार्फत तपासला जाईल. कामात त्रुटी असतील तर कारवाई केली जाईल.
टोल सुरू झाला तरी एसटी व स्कूल बसेस, छोट्या चारचाकी, दुचाकी यांना टोल लागणार नाही.
केवळ अवजड वाहनांकडूनच टोलची वसुली केली जाईल.
नियम व करारपत्रातील सर्व गोष्टींची शहानिशा करूनच टोल वसुलीसाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यात येईल.