कॉँग्रेसकडून सांगलीत ‘अच्छे दिन’ची पुण्यतिथी--अन् फास अडकला
By admin | Published: May 30, 2016 11:37 PM2016-05-30T23:37:40+5:302016-05-31T00:29:19+5:30
प्रतिकात्मक आंदोलन : केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा, कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने
सांगली : केंद्र शासनाने दिलेल्या अनेक आश्वासनांबरोबर ‘अच्छे दिन’च्या घोषणेची द्वितीय पुण्यतिथी करीत सांगली जिल्हा कॉँग्रेस समितीने सोमवारी सांगलीत प्रतिकात्मक आंदोलन केले. लोकहितविरोधी धोरणांचा उल्लेख करीत कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. स्टेशन चौकात हे आंदोलन झाले. यावेळी प्रदेश कॉँग्रेसचे उपाध्यक्ष सदाशिवराव पाटील, माजी आमदार हाफिज धत्तुरे उपस्थित होते. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला २६ मे रोजी सत्तेत येऊन दोन वर्षे पूर्ण झाली. लोकसभा निवडणुकीच्या काळात भारतीय जनता पक्षाने जनतेला अनेक आश्वासने दिली होती. त्यामुळे प्रमुख आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नाहीत, अशी टीकाही करण्यात आली.
सत्तेत आल्यानंतर शंभर दिवसात विदेशातील काळा पैसा भारतात आणून प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याची घोषणा करण्यात आली होती. शेतीमालाला उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा मिळेल इतका भाव देण्याचे आश्वासन दिले होते. महागाई कमी करून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात ठेवण्याची ग्वाहीसुद्धा दिली होती, मात्र गेल्या दोन वर्षात यातील एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही. ही आश्वासने पूर्ण करण्याच्या दृष्टीने कोणतेही पाऊल त्यांनी टाकलेले नाही. स्वस्त धान्य देण्याकरिता दिले जाणारे अंशदान बंद करून इंदिरा आवास योजनाही रद्द केली.
महिला, आदिवासी, दलित, अल्पसंख्याक यांच्याकरिता असलेल्या विविध योजनांचा निधीही कमी करण्यात आला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या दिवसेंदिवस चिंताजनक पद्धतीने वाढत असताना, त्यावर प्रभावी उपाययोजना होत नाही. पूर्ण कर्जमाफीचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. त्यामुळे या सरकारचा आम्ही निषेध करीत आहोत, असे पाटील म्हणाले.
आंदोलनात नगरसेवक सुरेश आवटी, शेवंता वाघमारे, बाळासाहेब काकडे, दिलीप पाटील, राजन पिराळे, अजित ढोले, सुभाष खोत, करीम मिस्त्री, सतीश पाटील, मालन मोहिते, अमित पारेकर, आनंदराव मोहिते, आयुब निशाणदार, सुनील शेडबाळे आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
अन् फास अडकला
प्रतिकात्मक आंदोलनाचा भाग म्हणून स्टेशन चौकातील एका झाडाला गळफासाची दोरी अडकवली होती. दोन कार्यकर्त्यांना टेबलवर उभे राहून केवळ तो फास हातात घेण्यास सांगितले होते. अचानक कॉँग्रेसचे संतोष पाटील यांनी गळ््यात फास अडकवला आणि टेबलवरून उडी मारली. त्यांच्या गळ््याचा फास आवळला. त्यामुळे सर्वांचीच पळापळ झाली. कार्यकर्त्यांनी वेळीच त्यांना धरून फास बाजूला केल्याने अनर्थ टळला. या घटनेने कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांना अक्षरश: घाम फुटला होता. त्यांनी या उतावीळ कार्यकर्त्यांना खडसावले. त्यांनी उडी मारली की पाय घसरला, याबाबत चर्चा सुरू होती. आंदोलनावेळी बंदोबस्तास असलेल्या पोलिसांचीही यामुळे धावपळ झाली. प्रतिकात्मक आंदोलनाचा हा प्रयत्न आंदोलनकर्त्यांच्या अंगलट आला.