काँग्रेसचा सांगलीत हल्लाबोल

By admin | Published: July 9, 2015 11:34 PM2015-07-09T23:34:00+5:302015-07-09T23:34:00+5:30

मोर्चा, सभांमधून शासनाचा निषेध : तालुकानिहाय जनजागृतीचा निर्धार

Congolese attacks Congress | काँग्रेसचा सांगलीत हल्लाबोल

काँग्रेसचा सांगलीत हल्लाबोल

Next

सांगली : शासनाच्या अनेक धोरणांचा निषेध करीत कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी गुरुवारी सांगलीत मोर्चा काढला. नंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत कॉँग्रेस नेत्यांनी शासनाच्या निर्णयांवर हल्लाबोल केला. सरकारविरोधात तालुकानिहाय जनजागृती करण्याचा निर्धार यावेळी सभेत करण्यात आला. माजी मंत्री आ. पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. कॉँग्रेस भवनपासून दुपारी साडेबारा वाजता मोर्चास सुरुवात झाली. आझाद चौक, स्टेशन चौक, राजवाडा चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आला. याठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख म्हणाले की, या सरकारला वेळीच रोखले नाही, तर महाराष्ट्रातील शेतकरी व कष्टकरी संकटात सापडतील. त्यामुळे आपल्या शेतकरी व कष्टकरी बांधवांना कॉँग्रेसनेच आधार दिला पाहिजे. जातीच्या नावावर केलेल्या विषारी प्रचाराला सध्याची तरुणाई भुलली होती. त्यांनी याच प्रचाराला बळी पडून भाजपला मतदान केले होते. आता या तरुणाईलाही सत्य पटवून देऊन पुन्हा कॉँग्रेसकडे घेतले पाहिजे. अनेकांचा रस्ता चुकला आहे. त्यांना योग्य मार्गावर आणण्याचे काम कॉँग्रेसने करावे.
पतंगराव कदम म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी राज्यात आणि देशात नरेंद्र मोदी यांची हवा होती. त्यांच्याच निर्णयामुळे आता त्यांची गोची झालेली आहे. भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये कॉँग्रेसने बाजी मारल्यामुळे राज्यातच नव्हे, तर आता देशातच कॉँग्रेसची हवा सुरू झालेली आहे. राज्यात सर्वत्र भाजपच्या घोटाळ्यांची चर्चा सुरू आहे. बोगस डिग्रीवाले शिक्षणमंत्री, व्यापमं घोटाळा अशा अनेक गोष्टींमुळे ही सरकारे कशापद्धतीने काम करताहेत, हे दिसत आहे. आता सुरुवात झाली आहे, अजून अनंत गोष्टी बाहेर येणार आहेत. हे सरकार दिशाहीन झाल्याने नागरिकांच्या पदरी काहीही पडलेले नाही.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, पृथ्वीराज पाटील, सत्यजित देशमुख, किशोर जामदार, माजी आमदार हाफिज धत्तुरे, आनंदराव मोहिते, नामदेवराव मोहिते, मालन मोहिते यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)


भाजपचे खोटे आंदोलन!
यावेळी प्रतीक पाटील म्हणाले की, जतच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असताना, भाजपच्या नेत्यांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. खोट्या आंदोलनाने कोणतेही प्रश्न कधी सुटत नाहीत. त्यामुळे अशा नेत्यांवर कितपत विश्वास ठेवायचा, याचा विचार जतच्या लोकांनीच आता केला पाहिजे. ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ या तिन्ही योजनांना किती पैसे हे नेते आणतात, हे दिसेलच.
कार्यकर्त्यांना चिमटा काढताना पतंगराव म्हणाले की, आता गावा-गावातील आपसांतील भांडणे सोडून द्या. तुमच्या गावाचे बजेट बुंडुकल्याएवढेही नसते. त्यामुळे तेवढ्या चिरीमिरीसाठी भांडण्यापेक्षा केंद्र व राज्याकडून निधी आणून गावाचा विकास करण्यावर भर द्या. या वाक्यावर उपस्थितांत हशा पिकला.

Web Title: Congolese attacks Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.