सांगलीत राष्ट्रवादीला केवळ २० जागांची आॅफर आघाडीचा गुंता : जागा वाटपात दोन्ही कॉँग्रेसचे घोडे अडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 12:29 AM2018-06-27T00:29:11+5:302018-06-27T00:29:37+5:30
महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडीचे घोडे जागा वाटपात अडले आहे. राष्ट्रवादीने ४३-३३ जागांचा दिलेला प्रस्ताव मंगळवारी काँग्रेसने फेटाळून लावला. काँग्रेसकडून ५८-२० जागांचा नवा प्रस्ताव राष्ट्रवादीकडे
सांगली : महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडीचे घोडे जागा वाटपात अडले आहे. राष्ट्रवादीने ४३-३३ जागांचा दिलेला प्रस्ताव मंगळवारी काँग्रेसने फेटाळून लावला. काँग्रेसकडून ५८-२० जागांचा नवा प्रस्ताव राष्ट्रवादीकडे पाठविण्यात आला आहे. जागा वाटपाचा गुंता दिवसेंदिवस वाढत चालला असून, काँग्रेसने सुधारित प्रस्ताव न दिल्यास स्वबळावर लढण्याचा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे. दोन्ही पक्षांकडून ताणाताणी सुरू झाल्याने, पहिल्या टप्प्यावर आघाडी फिसकटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीअंतर्गत हालचाली गतिमान झाल्या आहेत. जिल्ह्यात भाजपचा विजयी रथ रोखण्यासाठी दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडी करण्यावर वरिष्ठ नेत्यांत एकमत झाले. पण जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. आघाडीसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सुरूवातीपासूनच काँग्रेसकडे हात पुढे केला आहे. पण काँग्रेस नेतृत्वाकडून सावध पवित्रा घेतला जात आहे.
गेल्याच आठवड्यात आघाडीसंदर्भात काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्यासोबत दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांची प्राथमिक बैठक झाली. यात राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी जागा वाटपाचा प्रस्ताव दिला होता. त्यात राष्ट्रवादीने ४३, तर काँग्रेसने ३३ जागा लढवाव्यात, अशी मागणी केली होती. पण या प्रस्तावाला काँग्रेसने नकार दिला.
सोमवारी काँग्रेसच्या नेत्यांची चर्चा झाली. या बैठकीला शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महापौर हारुण शिकलगार, गटनेते किशोर जामदार, राजेश नाईक आदींसह प्रमुख नगरसेवक उपस्थित होते. सध्या काँग्रेसचे ४३ नगरसेवक आहेत. असे असताना राष्ट्रवादीकडून जादा जागांची मागणी अवास्तव आहे, असा सूर बैठकीतून पुढे आला. उलट राष्ट्रवादीचे २४ संख्याबळ असले तरी, चिन्हावर केवळ १८ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना २० जागाच द्याव्यात. काँग्रेसची ताकद मोठी असल्याने ५८ जागा लढवाव्यात, असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मंगळवारी पृथ्वीराज पाटील यांनी याबाबत जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम, युवक काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष आमदार डॉ. विश्वजित कदम, जयश्रीताई पाटील, माजी मंत्री प्रतीक पाटील यांनाही ५८-२० च्या प्रस्तावाची माहिती दिली.
त्यानंतर हा प्रस्ताव राष्ट्रवादीकडे पाठविला. काँग्रेसच्या या प्रस्तावावर राष्ट्रवादीतून नाराजी व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीचे १८ व सहा अपक्ष असे २४ संख्याबळ असताना काँग्रेसने २० जागा देऊन चेष्टा केल्याचा आरोप होत आहे. राष्ट्रवादीनेही काँग्रेसचा हा प्रस्ताव धुडकावला आहे.
आमने-सामने चर्चा : पृथ्वीराज पाटील
पृथ्वीराज पाटील म्हणाले, राष्ट्रवादीकडून ताकदीपेक्षा जादा जागांची मागणी केली होती. उलट महापालिका हद्दीत काँग्रेसची ताकद मोठी आहे. राष्ट्रवादीने सध्याच्या त्यांच्याकडील जागांपेक्षा दुप्पट जागांची मागणी करणे चुकीचे आहे. त्यांना आम्ही २० जागांचा प्रस्ताव देऊ केला आहे. याबाबत संजय बजाज यांच्याशी चर्चा केली. आता दोन्ही पक्षांचे नेते आमने-सामने बसून जागा वाटपावर चर्चा करतील.
..अन्यथा स्वबळावर लढू : संजय बजाज
महापालिकेत राष्ट्रवादीचे विद्यमान २४ नगरसेवक आहेत. काँग्रेसने दिलेला २० जागांचा प्रस्ताव चुकीचा आहे. हा प्रस्ताव आम्हाला मान्य नाही. भाजपला रोखण्यासाठी दोन्ही पक्षाची आघाडी व्हावी, अशी आमची भूमिका आहे. शहरात राष्ट्रवादीची ताकद असून, सन्मानजनक प्रस्ताव आला तरच आम्ही आघाडीवर चर्चा करू, अन्यथा स्वबळावर लढण्यास आम्ही सज्ज आहोत, अशी प्रतिक्रिया शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी दिली.