सांगली जिल्हा परिषदेत विजयाचा जल्लोष : पंचायत राज अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:24 AM2018-10-31T00:24:31+5:302018-10-31T00:26:57+5:30
रांगोळ्या, फुलांच्या कुंड्या, रोषणाई, धनगरी ढोलांचा निनाद, पालखी, पक्षीय मतभेद बाजूला सारून एकीचे फेटे बांधलेले आजी-माजी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाºयांनी धरलेला ताल... अशा वातावरणात मंगळवारी जिल्हा परिषदेने जल्लोष केला.
सांगली : रांगोळ्या, फुलांच्या कुंड्या, रोषणाई, धनगरी ढोलांचा निनाद, पालखी, पक्षीय मतभेद बाजूला सारून एकीचे फेटे बांधलेले आजी-माजी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाºयांनी धरलेला ताल... अशा वातावरणात मंगळवारी जिल्हा परिषदेने जल्लोष केला.
निमित्त होते, यशवंत पंचायत राज अभियानात राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्याचे. जिल्हा परिषद, जिल्हा बँक, राम मंदिर चौक या मार्गावरून मिरवणूकही काढण्यात आली.यशवंत पंचायत राज अभियानात उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा परिषदेला तीस लाख रुपयांचा पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले. त्यानिमित्त मंगळवारी मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीनंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी अभियानातील यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती डॉ. सुषमा नायकवडी, अरुण राजमाने, तम्मणगौडा रवी-पाटील, ब्रम्हानंद पडळकर, माजी अध्यक्ष देवराज पाटील, स्नेहल पाटील, रेश्माक्का होर्तीकर, बसवराज पाटील, रणजित पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्ष देशमुख म्हणाले की, जिल्हा परिषदेला यशवंत पंचायत राजचा राज्यातील प्रथम पुरस्कार मिळाला आहे. राज्यातील सर्व पुरस्कार जिल्हा परिषद मिळवेलच, पण यापुढे राष्ट्रीय पातळीवरही चमकेल. या पुरस्काराच्या माध्यमातून सरकारने जिल्ह्यातील जनतेचा सन्मान केला. देशाचे, राज्याचे नेतृत्व येथून घडते. यापुढेही यशाचा हा वारसा कायम ठेवू. आगामी वर्षात जिल्ह्यातीलच नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारही मिळेल, असे कामकाज केले जाईल. यानिमित्ताने सर्व गट-तट, पक्ष सोडून एकत्रित येण्याचे हे वातावरण सभागृहातही कायम ठेवू.
राऊत म्हणाले की, हा पुरस्कार म्हणजे कामाची सुरुवात आहे. सामान्य जनतेचे कामातून समाधान होणे, हा खरा मोठा पुरस्कार असून तो पुरस्कारही मिळवण्यासाठी अधिक गतीने काम करू. त्यासाठी यशवंत पंचायत राजप्रमाणेच सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे.
माजी अध्यक्षा स्नेहल पाटील म्हणाल्या की, हे यश टीमवर्कचे फळ आहे. एकजुटीने काम केले तर, नक्कीच यश मिळते. जिल्हा परिषदेत चांगल्या कामाचे सातत्य ठेवावे.पुरस्कार स्वीकारण्यासाठी व आनंदोत्सवात सहभागी होण्यासाठीही माजी पदाधिकाºयांना आवर्जून बोलावले, याबद्दल अध्यक्ष देशमुख व पदाधिकाºयांचे त्यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास माजी सभापती गजानन कोठावळे, संजीवकुमार सावंत, दत्तात्रय पाटील, किसन जानकर, दत्तात्रय पाटील, जितेंद्र पाटील, अभिजित पाटील, छायाताई खरमाटे, जनार्दन झिंबल, जयश्री पाटील, पवित्रा बरगाले, संयोगीता कोळी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, नीलेश घुले, दीपाली पाटील, शिल्पा पाटील आदी उपस्थित होते.
मिनी मंत्रालय चमकेल : संग्रामसिंह देशमुख
जिल्हा परिषदेचा प्रगतीचा आलेख यापुढेही असाच ठेवण्यासाठी विकासाला गती देणार आहे. एवढे चांगले काम करू की, भविष्यात राष्ट्रीय पातळीवरही जिल्हा परिषद चमकेल, असा विश्वास अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी व्यक्त केला. जुन्या प्रादेशिक योजनांच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. आरोग्य विभागही सक्षम करण्यावर भर असणार आहे. शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न चालू असून, शिक्षक आणि शिक्षक संघटनांचे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
नाराज सदस्यांची चर्चा
जिल्हा परिषद पदाधिकारी बदलासाठी अग्रेसर असलेल्या गटाचे सदस्य विजयी रॅलीपासून दूर होते. याची उपस्थितांमध्ये चर्चा रंगताच बंड केलेले सदस्य रॅलीत पुन्हा सहभागी झाले. त्यामुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला.