सांगली लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 02:54 PM2019-04-22T14:54:15+5:302019-04-22T14:54:59+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी दि. २३ रोजी मतदान होणार आहे. मतदान संपण्याच्या अगोदर उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी प्रचार थांबवायचा असून, आयोगाच्या निर्देशाचे पालन करण्यात यावे. मतदानासाठीची सर्व ती तयारी प्रशासकीय पातळीवरून पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी रविवारी दिली.
सांगली : लोकसभा निवडणुकीसाठी दि. २३ रोजी मतदान होणार आहे. मतदान संपण्याच्या अगोदर उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी प्रचार थांबवायचा असून, आयोगाच्या निर्देशाचे पालन करण्यात यावे. मतदानासाठीची सर्व ती तयारी प्रशासकीय पातळीवरून पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची तयारी व प्रशासकीय यंत्रणेच्या सज्जतेची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, सांगली लोकसभा मतदारसंघात १२ उमेदवार निवडणूक लढवित असून, रविवारी सायंकाळी सहा वाजता प्रचाराची मुदत संपलेली आहे. त्यामुळे आता यापुढे मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवारांनी अथवा त्यांच्या समर्थकांनी प्रचार यंत्रणा राबवू नये. अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघात १८ लाख ३ हजार ५४ मतदार संख्या असून, त्यात ९ लाख २९ हजार २३२ पुरूष, तर ८ लाख ७३ हजार ७४९ स्त्री मतदार आहेत. मतदार संघातील १०३९ इमारतींमध्ये १८४८ मतदान केंद्रे आहेत. केंद्रांवर मतदानासाठी २१८५ मतदान यंत्रे, २२८४ सेंट्रल युनिट, तर २३२७ व्हिव्हीपॅट यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. टपाली मतदानासाठी १२ हजार ३२७ जणांनी अर्ज केला होता, सर्वांना टपाली मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत.
यात ६०५५ सैनिक आहेत, तर १२ हजार ३२७ निवडणूक कामकाजातील अधिकारी, कर्मचारी आहेत. मतदान प्रक्रियेत ८ हजार ५०५ कर्मचारी कार्यरत असून संपूर्ण जिल्ह्यासाठी ११ हजार ३३९ कर्मचारी आहेत. मतदान केंद्रामध्ये मोबाईल वापरावर बंदी असून याचे उल्लंघन केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होईल. मतदानादिवशी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली असून या दिवशीचे आठवडा बाजार, जत्रा, यात्रा पुढे ढकलले आहेत.