तासगावात दुकाने उघडण्यासाठी काँग्रेस आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:19 AM2021-07-20T04:19:42+5:302021-07-20T04:19:42+5:30
तासगाव : कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापारीपेठा उद्ध्वस्त झाल्या आहेत. व्यापाऱ्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. तासगावचा पॉझिटिव्हिटी रेट ...
तासगाव : कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापारीपेठा उद्ध्वस्त झाल्या आहेत. व्यापाऱ्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. तासगावचा पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे तासगाव शहरातील व्यापाऱ्यांना निर्बंध पाळून व्यापार सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी तासगाव तालुका काँग्रेसने केली आहे. या वेळी व्यापारी प्रतिनिधींनी आपल्या व्यथा तहसीलदारांसमोर मांडल्या.
काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एप्रिल २०२१ पासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तासगावमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. मध्यंतरी आठ-पंधरा दिवस दुकाने उघडली आणि सांगली जिल्हा कोरोना साथीच्या चौथ्या टप्प्यात गेल्याने पुन्हा लॉकडाऊन केला आहे. आम्ही सर्व व्यापारी या लॉकडाऊनमुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडलो आहोत. वास्तविक गर्दी टाळणे हा कोरोनावर उपाय जरी असला तरी अत्यावश्यक सेवा वगळून बंद असलेल्या दुकानांमुळे गर्दी होते, असे म्हणणे अवास्तव आहे. शिवाय तासगाव शहराची लोकसंख्या आणि सापडणारे कोरोना रुग्ण पाहता डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णांपेक्षा कोरोना रुग्णसंख्या कमी आहे. शिवाय तालुक्याचा अँटिजन टेस्टचा पॉझिटिव्हिटीचा रेटही ८.५ टक्के इतका आहे.
या सगळ्या गोष्टींचा विचार करून प्रशासनाने तासगाव शहरातील व्यापार सुरू करायला परवानगी द्यावी. व्यापारी स्वतःहून कोरोनाचे नियम पाळून व्यापार करतील, अशी ग्वाही व्यापाऱ्यांनी दिली. या वेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष महादेव पाटील यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.