स्थायी सभापती निवडणुकीत काँग्रेस एकाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:32 AM2021-09-07T04:32:50+5:302021-09-07T04:32:50+5:30
सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीत विरोधी काँग्रेस पक्ष एकाकी पडला आहे. या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी काँग्रेसने ...
सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीत विरोधी काँग्रेस पक्ष एकाकी पडला आहे. या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी काँग्रेसने दोन दिवसांपासून जोर लावला होता. पण, त्याला अपेक्षित साथ मिळत नसल्याचे दिसत आहे. सोमवारी महसूलमंत्री व विभागीय आयुक्तांकडे निवड प्रक्रियेबाबत तक्रार करण्यात आली. त्यावर मंगळवारपर्यंत निर्णय न झाल्यास सभापती निवडीसह भाजपचाही मार्ग मोकळा होणार आहे.
महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीची ९ रोजी निवड आहे. या पदासाठी ८ रोजी उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत. नगरसचिव कार्यालयाने त्यासाठी शुक्रवारी सदस्यांना नोटीस बजावली. पण, ही नोटीस शनिवारी सदस्यांच्या हाती पडली. या मुद्द्यावर काँग्रेसने निवड प्रक्रियाच बेकायदेशीर असल्याचा दावा करीत निवडी लांबणीवर टाकण्याची मागणी केली. सोमवारी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे लेखी तक्रारी करीत निवड प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी केली.
महसूलमंत्री थोरात यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील व शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सभापती निवडीबाबत थोरात यांच्याशी चर्चा केली. काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न सुरू असताना राष्ट्रवादीकडून मात्र अपेक्षित साथ मिळत नसल्याचे समजते. राष्ट्रवादीचे तीन सदस्य काँग्रेस उमेदवाराच्या पाठीशी राहतील; पण इतर जुळवाजुळव करण्यात मात्र राष्ट्रवादीने हात आखडता घेतला आहे. त्यामुळे सभापती निवडणुकीत काँग्रेस एकाकी पडली आहे.
काँग्रेसच्या तक्रारीवर मंगळवारपर्यंत निर्णय न झाल्यास गुरुवारी सभापती पदाची निवडणूक निर्वेधपणे पार पडणार आहे. त्यामुळे भाजपचे टेन्शनही कमी होणार आहे. निवडणुका लांबणीवर टाकून भाजपचे सदस्य गळाला लावण्याचे काँग्रेसचे स्वप्न भंगणार आहे.
चौकट
भाजपचा उमेदवार बुधवारी ठरणार
भाजपमधून सभापतीपदासाठी निरंजन आवटी, जगन्नाथ ठोकळे, संजय यमगर, सविता मदने यांची नावे चर्चेत आहेत. सध्या सर्वच नऊ सदस्य हैदराबादमध्ये आहेत. उमेदवारीसाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे. बुधवारी भाजपचे आमदार, कोअर कमिटी सदस्यांत चर्चा होईल. त्यानंतर प्रदेशाध्यक्षांकडे नावे दिली जातील. त्यांच्याकडूनच उमेदवारीवर अंतिम शिक्कामोर्तब केले जाणार आहे.