ग्रामपंचायतींसाठी काँग्रेस आणि भाजपमध्येच सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:51 AM2020-12-17T04:51:55+5:302020-12-17T04:51:55+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कडेगाव : कडेगाव तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जानेवारीमध्ये होत आहेत. यामध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कडेगाव : कडेगाव तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जानेवारीमध्ये होत आहेत. यामध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगणार आहे. दोन्ही बाजूंनी मोर्चेबांधणीला वेग आला आहे.
कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची
ठरणार आहे. कडेगाव तालुक्यातील ढाणेवाडी, अंबक, शिरसगाव, सोनकिरे, येतगाव, शिवणी, कान्हरवाडी, कोतीज, रामापूर या
९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यापैकी ढाणेवाडी, अंबक, शिरसगाव, सोनकिरे या चार ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे, तर येतगाव, शिवणी, कान्हरवाडी, कोतीज, रामापूर या ५ ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व आहे. आता या सर्व ठिकाणी पुन्हा सत्तासंघर्ष रंगणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने कदम आणि लाड यांच्या गटात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले आहेत.
यामुळे ग्रामपंचायत स्तरावरही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे भाजपपुढे आव्हान उभा राहणार आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भावकीचे व पाडापाडीचे आणि जिरवा-जिरवीचे राजकारण रंगलेले असते. मात्र या निवडणूक निकालावर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची राजकीय गणिते अवलंबून असतात. त्यांमुळे या निवडणुकीला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
चौकट :
बिनविरोधला अडथळा
सरपंच आरक्षण सोडत निवडणुकीनंतर होणार आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध करताना अडचण होत आहे. गावात प्रबळ असलेल्या गटाने विरुद्ध गटास ज्या प्रवर्गातील जागा सोडली असेल, त्याच प्रवर्गाचे सरपंच आरक्षण आले तर?
बिनविरोध करून प्रबळ गटाची फसगत होईल, अशी चर्चा आहे.
फोटो : विश्वजित कदम व संग्रामसिंह देशमुख यांचा फोटो वापरावा.