मिरजेतील काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त

By admin | Published: February 24, 2017 11:49 PM2017-02-24T23:49:43+5:302017-02-24T23:49:43+5:30

तालुक्याचे चित्र : घोरपडेंच्या विकास आघाडीचा फुगा फुटला; भाजपचा पंचायत समितीवर झेंडा

Congress bastion destroyed in Mirza | मिरजेतील काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त

मिरजेतील काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त

Next


सदानंद औंधे ल्ल मिरज
मिरज तालुक्यात भाजपने जिल्हा परिषदेच्या सात व पंचायत समितीत दहा जागा जिंकून काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला आहे. मिरज पंचायत समितीत भाजपने सत्ता हस्तगत करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. मिरज पूर्व भागात राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढविणाऱ्या अजितराव घोरपडे यांच्या विकास आघाडीचा फुगा फुटला आहे.
मिरज तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ११ पैकी तब्बल सात ठिकाणी भाजप उमेदवार निवडून आले. काँग्रेसचे केवळ तीन सदस्य निवडून आले. मिरज पूर्व भागातील मालगाव, आरग, बेडग, म्हैसाळ या चारही जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपने यश मिळविले. पश्चिम भागातील बुधगाव, कवलापूर, समडोळी येथे भाजपला यश मिळाले. गत जिल्हा परिषद निवडणुकीत दहापैकी आठ जागा मिळविणाऱ्या काँग्रेसला यावेळी केवळ तीन जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीला एकही जागा मिळाली नाही. मिरज पूर्व भागात मालगाव व एरंडोली येथे बंडखोरांनी काँग्रेसला आव्हान दिले होते. काँग्रेसमधील बंडखोरीचा मालगावात फटका बसला. एरंडोलीत काँग्रेसच्या जयश्री पाटील यांना निसटता विजय मिळाला.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपूर्वी मिरज पूर्व भागातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी केलेला भाजप प्रवेश फायद्याचा ठरला आहे. मालगाव जिल्हा परिषदेसह गुंडेवाडी व मालगाव पंचायत समिती मतदारसंघात आयात उमेदवार निवडून आले आहेत. म्हैसाळमध्ये मनोज शिंदे व केदारराव शिंदे यांच्या काँग्रेस व राष्ट्रवादी गटाने एकत्रित येऊन निवडणूक लढविली होती. मात्र म्हैसाळ गटासह म्हैसाळ व टाकळी गणातून भाजपच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविल्याने, म्हैसाळातील सरकारांचे वर्चस्व संपुष्टात येऊन दीपकबाबा शिंदे गटाला यश मिळाले आहे. आरग येथे भाजपविरोधात एकत्र आलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्वपक्षीय आघाडीची मोट अयशस्वी ठरली. मात्र पश्चिम भागात राष्ट्रवादीविरोधात काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना असा संघर्ष असल्याने, येथे भाजपला बुधगाव, कवलापूर व समडोळी गटात व पंचायत समितीत बुधगाव व इनाम धामणी या दोन पंचायत समिती मतदारसंघात विजय मिळाला आहे. गुंडेवाडी, मालगाव, नरवाड, खटाव, आरग, म्हैसाळ, टाकळी, इनाम धामणी, बुधगाव, बेडग पंचायत समिती मतदार संघात भाजपला यश मिळाले. सोनी, भोसे, सलगरे, बामणोली, कवलापूर, माधवनगर, कवठेपिरान, पंचायत समिती मतदारसंघात काँग्रेस , समडोळी, कसबे डिग्रज येथे राष्ट्रवादी काँग्रेस, दुधगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना, एरंडोलीत अजितराव घोरपडे यांची विकास आघाडी व नांद्रे मतदारसंघात अपक्ष उमेदवार निवडून आला.
पंचायत समितीत भाजपचे दहा सदस्य निवडून आल्याने, पंचायत समिती स्थापनेपासून सत्तेवर असलेल्या काँग्रेसने मिरज पंचायत समितीत पहिल्यांदाच सत्ता गमावली आहे. मिरज पूर्व भागात माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या विकास आघाडीसोबत निवडणूक लढविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पानिपत झाले. पूर्व भागात एकत्रित आलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी व विकास आघाडीला मतदारांनी नाकारले. अजितराव घोरपडे यांच्या एकमेव समर्थक शालन भोई एरंडोली पंचायत समिती मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. पंचायत समितीत आता त्या भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. मिरज पंचायत समितीत भाजपला आणखी दोन सदस्यांची आवश्यकता असून, अपक्षांच्या मदतीने सत्ता हस्तगत करणे भाजपला शक्य होणार आहे.

Web Title: Congress bastion destroyed in Mirza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.