काँग्रेस-भाजपत चढाओढ

By admin | Published: March 5, 2017 12:43 AM2017-03-05T00:43:52+5:302017-03-05T00:43:52+5:30

महापालिकेचे राजकारण : विकासकामांचा जोर वाढला

Congress-BJP bout | काँग्रेस-भाजपत चढाओढ

काँग्रेस-भाजपत चढाओढ

Next

शीतल पाटील --सांगली --महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सव्वा वर्षाचा कालावधी उरला आहे. पालिकेच्या सत्तेचे सिंहासन काबीज करण्यासाठी भाजपने विकास कामांवर जोर दिला आहे. त्यात आता पालिकेतील सत्ताधारी गटानेही विकास कामांबाबत गिअर बदलून वेग घेतला आहे. त्याचा प्रत्यय येत असून, गेल्या महिन्याभरात काँग्रेसने तब्बल ३४ कोटींची कामे मंजूर केली आहेत. महापालिकेच्या सत्तेचा मुकुट कायम राखण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी दम लावण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे भविष्यात विकासकामे व त्यांच्या श्रेयावरून भाजप-काँग्रेसमध्ये चढाओढ दिसणार आहे.
लोकसभा, विधानसभेपाठोपाठ नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिल्ह्यात भाजपचाच बोलबाल राहिला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या नेत्यांनी सांगली महापालिकेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ व सुरेश खाडे यांनी ‘मिशन महापालिका’साठी नियोजनाला सुरूवात केली आहे. अधुनमधून भाजपच्या मंत्र्यांना महापालिका क्षेत्रात आणून विकास कामांचे उद््घाटन होऊ लागले आहे. नुकतेच सुधीर गाडगीळ यांनी शहरातील मूलभूत सोयी-सुविधांसाठी ३३ कोटींचा निधी मंजूर करून आणला. त्यापैकी १७ कोटी रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्तही झाले आहेत. या निधीतील कामांवरून मध्यंतरी पालिकेत मोठा गदारोळ झाला होता. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सुचविलेली कामे आमदार निधीत कशी समाविष्ट झाली, यावरून आयुक्त रवींद्र खेबूडकर यांना धारेवर धरण्यात आले होते. पण त्यावेळी जिल्हा परिषदेची निवडणूक झालेली नव्हती. त्यामुळे केवळ आयुक्तांवर आरोप-प्रत्यारोप करण्यातच पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी धन्यता मानली.
महापौर हारूण शिकलगार यांनी आमदार निधीतून कामे वगळायला लावून महापालिका निधीतून विकासकामे करण्याचा आग्रह धरला. त्यासाठी शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांच्या सुधारणेसाठी २४ कोटीचा प्रस्ताव तयार करण्यात आला. यापैकी दहा कोटी रुपये जिल्हा नियोजन समितीतून देण्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती. जिल्हा नियोजनमधून निधी आला नाही तरी, पालिकेच्या निधीतून रस्त्यांची कामे करण्याचा विडा काँग्रेसने उचलला आहे. सुरूवातीला या निधीतील कामांवर नगरसेवकांचा वाद रंगला. पण हा वाद संपुष्टात आणून २४ कोटीची निविदा प्रसिद्ध करण्यात आली. ही निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पुढील महिन्याभरात या कामांना सुरूवात होणार आहे. त्यासाठी एक मोठा कार्यक्रम घेण्याची तयारीही काँग्रेसने सुरू केली आहे.
नुकताच काँग्रेसमधील मदनभाऊ गटाने महापौरांच्या राजीनाम्यासाठी आग्रह धरला. महापौर शिकलगार हे विरोधकांची कामे करतात, सत्ताधाऱ्यांच्या कामाकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप स्वकीयांनी केला. स्वकीयांच्या या हल्ल्यानंतर महापौर शिकलगार यांनी थेट आयुक्तांचे निवासस्थान गाठले. एका दिवसात दहा कोटीच्या फायली मार्गी लावल्या. यात मागासवर्गीय समितीच्या पाच कोटीच्या निधीचाही समावेश आहे. त्याशिवाय नगरसेवकांच्या प्रभागातील २५ लाखांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. या दहा कोटीच्या कामांची निविदाही महिन्याभरात प्रसिद्ध होऊन पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
दुसरीकडे भाजपने ३३ कोटीच्या निधीचे उद््घाटन एप्रिल महिन्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीनंतर उद््घाटनाचा कार्यक्रम निश्चित होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगलीत आणण्याच्या प्रयत्न सुरू आहे. पालिका हद्दीतील कामासोबतच हरिपूर-कोथळी पुलाच्या कामाचे उद््घाटनही घेण्यात येणार असल्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले.
महापालिकेची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसा सत्ताधारी काँग्रेस व भाजपने विकास कामांसाठी जोर लावला आहे. त्यामुळे वर्षभरात दोन्ही बाजूंनी कामाच्या श्रेयासाठी संघर्षाची तयारीही चालविली आहे. दोन्ही पक्षांच्या श्रेयवादात किमान शहरातील नागरिकांच्या विकासांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.


आयुक्तांकडून सपाटा : गिअर बदलला
आयुक्त रवीद्र खेबूडकर यांनी पदभार हाती घेतल्यानंतर आस्ते कदम कारभाराला सुरूवात केली होती. प्रत्येक फायलीची चार-चारदा तपासणी होत होती. बोगसगिरीला आळा घालण्यासाठी काही नियमात बदलही केले. त्यामुळे त्यांचा कारभार संथगतीने सुरू असल्याचा आरोप होत होता. महापालिकेचा कारभार भाजपच्या कार्यालयात सुरू असल्याचा आरोपही गौतम पवार यांनी केला होता. या सर्व प्रकारामुळे प्रशासनाबद्दल संशयाचे वातावरण होते. पण आता खुद्द आयुक्तांनीच गिअर बदलला आहे. विकास कामांच्या फायली वेगाने मंजूर होत आहेत. एकीकडे विकास कामांवर भर देताना आयुक्तांनी उत्पन्नवाढीकडेही लक्ष केंद्रित केले आहे. पालिकेचा गाडा हाकताना उत्पन्न व खर्चाचा ताळमेळही घातला जात आहे.

Web Title: Congress-BJP bout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.