निवडणूक वादातून शिपूरला काँग्रेस-भाजपमध्ये हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:22 AM2020-12-26T04:22:27+5:302020-12-26T04:22:27+5:30
मिरज तालुक्यात २२ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. गावातून अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. मात्र राजकीय गटबाजी ...
मिरज तालुक्यात २२ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. गावातून अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. मात्र राजकीय गटबाजी उफाळून हाणामारी सुरू झाली आहे. शिपूर ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी व भाजप युतीची सत्ता असून काॅंग्रेस व राष्ट्रवादीचा एक गट याविरोधात आहेत. निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपसमर्थक गटाकडून उमेदवार निवड सुरू आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू असताना उमेदवार निवडीच्या कारणावरून शुक्रवारी दुपारी पोपट बाबर व शरद बाबर यांच्यात वाद होऊन पोपट बाबर यांना मारहाण झाली. राजकीय वैमनस्यातून भाजप समर्थकांनी हल्ला केल्याची पोपट बाबर यांनी तक्रार केली. भाजप समर्थकांनीही काँग्रेस कार्यकर्त्यांनी शरद बाबर यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप केला. जखमी बाबर यांना उपचारासाठी मिरजेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोपट बाबर यांनी भाजप तालुका सरचिटणीस शरद बाबर यांच्यासह आठजणांविरुद्ध ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली आहे. शरद बाबर यांनीही काँग्रेस समर्थकांविरुद्ध तक्रार केली. याबाबत रात्री उशिरापर्यंत ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
काँग्रेसकडून निषेध
शिपूर येथे ग्रामपंचायत निवडणुकीतून हाणामारीच्या घटनेचा तालुका काँग्रेस अध्यक्ष अण्णासाहेब कोरे व पंचायत समिती सदस्य अनिल आमटवणे यांनी निषेध केला. भाजप समर्थकांच्या गुंडगिरीला यापुढे ‘जशास तसे’ उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.