काँग्रेस-भाजपत रस्ते कामावरून जुंपली... सांगली संजयनगरातील प्रकार : शासन व महापालिकेचाही निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:28 AM2017-12-29T00:28:59+5:302017-12-29T00:31:04+5:30
सांगली : संजयनगर येथील एका रस्त्याच्या कामावरून काँग्रेस व भाजपत वाद रंगला आहे. हा रस्ता महापालिकेच्या निधीतून मंजूर केला आहे. शिवाय शासन निधीतही रस्त्याचे काम
सांगली : संजयनगर येथील एका रस्त्याच्या कामावरून काँग्रेस व भाजपत वाद रंगला आहे. हा रस्ता महापालिकेच्या निधीतून मंजूर केला आहे. शिवाय शासन निधीतही रस्त्याचे काम आहे. काँग्रेसने या रस्त्याच्या कामाचा गुरूवारी नारळ फोडला असून, त्याला भाजपने विरोध केला आहे. काँग्रेसने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे, तर भाजपने महापालिका आयुक्तांकडे धाव घेतली आहे.
महापालिका हद्दीतील मुख्य रस्त्यांसह उपनगरांतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. महापालिकेने मुख्य रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी २४ कोटीचा निधी मंजूर केला आहे. यातून सांगली, मिरज व कुपवाड या तीन शहरातील ३२ रस्त्यांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत, तर भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनीही शहरातील रस्त्यांच्या कामासाठी मुख्यमंत्र्यांकडे विशेष प्रयत्न करून ३३ कोटीचा निधी आणला आहे. आ. गाडगीळ यांच्या कामासाठी दीड वर्षापूर्वी महापालिकेने ना हरकत दाखले दिले होते. त्यामुळे महापालिकेतील नगरसेवकांनी शासन निधीतील कामांचा समावेश करण्यात आल्याचे सांगत प्रशासनाने त्यांच्या प्रभागातील अनेक कामे रद्द केली होती.
दरम्यान, महापालिका व शासन निधी यातील कामांचा घोळ अद्याप मिटलेला दिसत नाही. संजयनगर येथील बसस्थानक ते सहारा चौक हा रस्ता महापालिकेच्या दलित वस्ती सुधार योजनेतून मंजूर करण्यात आला. त्यासाठी १७ लाख रुपयांची निविदा काढली आहे. हाच रस्ता आ. गाडगीळ यांच्या शासन निधीतही समाविष्ट आहे. त्यामुळे संजयनगरमधील काँग्रेस व भाजप समर्थकांत रस्त्यांच्या कामाचा श्रेयवाद उफाळून आला आहे.
या रस्त्याचे दलित वस्ती सुधार योजनेतून महापालिकेमार्फत जिल्हा नियोजन समितीने हे काम मंंजूर केले आहे. या कामाचा गुरुवारी महापालिकेने प्रारंभ केला. यातून चांगलाच वाद रंगला. हे काम जिल्हाधिकाºयांच्या मान्यतेने झाले आहे. दलित वस्ती सुधार योजनेतील हा निधी अन्यत्र खर्च करता येत नाही. त्यासाठी शासन निधीतून या रस्त्यासाठीचा निधी अन्यत्र खर्च करावा, अशी मागणी काँग्रेसचे युवानेते संजय कांबळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली.
भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक माने यांनी हे काम थांबवावे, अशी मागणी करीत आयुक्तांना साकडे घातले. दलित वस्ती सुधार योजनेतून हे काम मंजूर असले तरी, महापालिकेने वर्कआॅर्डर न घेता हे काम सुरू कसे केले? असा जाब त्यांनी विचारला. हे बेकायदेशीर काम रद्द करावे, अशी मागणी त्यांनी केली.
रस्तेकाम उद्घाटन : लगीनघाई सुरू...
आ. गाडगीळ यांनी शासनाकडून मंजूर करून आणलेल्या ३३ कोटीतील कामांचे उद्््घाटन करण्यास सुरूवात केली आहे. संजयनगर येथे शुक्रवारी या रस्त्यांच्या कामाचा प्रारंभ केला जाणार आहे. तत्पूर्वीच काँग्रेसने या रस्त्याच्या कामाचा नारळ फोडला.
स्थायी समितीचे सभापती बसवेश्वर सातपुते, माजी महापौर कांचन कांबळे, नगरसेवक मनगू आबा सरगर यांच्या उपस्थितीत कामाला सुरूवात करण्यात आली. कामाच्या ठिकाणी फलकही लावला. ही बाब भाजप समर्थकांच्या लक्षात येताच त्यांनीही या रस्त्यावर फलक लावला आहे. तसेच शुक्रवारी खा. संजयकाका पाटील, आ. गाडगीळ यांच्या उपस्थितीत उद््घाटन घेण्याचा निश्चय केला आहे. महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याने काँग्रेस व भाजपमध्ये विकास कामांवरून रस्सीखेच सुरू झाली आहे.