कडेगाव तालुक्यात काँग्रेस-भाजपात टशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:24 AM2020-12-23T04:24:02+5:302020-12-23T04:24:02+5:30
कडेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक लागलेल्या ९ गावांमध्ये इच्छुकांनी गाठीभेटींवर भर दिला आहे. यात खास करून गत निवडणुकीत झालेल्या पराभवाचा ...
कडेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक लागलेल्या ९ गावांमध्ये इच्छुकांनी गाठीभेटींवर भर दिला आहे. यात खास करून गत निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढणार, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. ग्रामपंचायतींची सत्ता आपल्याच ताब्यात रहावी यासाठी काँग्रेस, भाजपचे नेते कामाला लागले आहेत.
पुणे पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने कदम व लाड गटात निर्माण झालेल्या मैत्रीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधात महाविकास आघाडीचे पॅनेल या निवडणुकीत एकत्र येताना दिसणार आहे. काही गावात स्थानिक राजकारणामुळे वेगळे चित्र पाहावयास मिळणार आहे. काँग्रेसचा झेंडा जास्तीत-जास्त ग्रामपंचायतींवर फडकविण्याचे आव्हान कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्यासमोर आहे. त्यादृष्टीने त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
भाजपचे नेते, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनीही जास्तीत-जास्त ग्रामपंचायती भाजपकडे घेण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अरुण लाड यांनीही कार्यकर्त्यांना आदेश देऊन ग्रामपंचायत निवडणुकीची चाचपणी सुरू केली आहे. यात बहुतांशी गावांत राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेसबरोबर आघाडी करेल, असेच चित्र आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनीही महाविकास आघाडीला पोषक असे काम करण्याची भूमिका घेतली आहे. एकंदरीत गावपातळीवर भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढाई या निवडणुकीत पाहावयास मिळणार आहे.
चौकट काटे की टक्कर
कडेगाव तालुक्यातील येतगाव, ढाणेवाडी, कान्हरवाडी, कोतिज, शिवणी, रामापूर, अंबक, सोनकिरे, शिरसगाव या गावांमध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. अपवाद वगळता सर्वत्र काट्याची टक्कर होणार आहे.