काँग्रेसच्या अलकादेवी शिंदे विजयी
By admin | Published: July 2, 2015 11:32 PM2015-07-02T23:32:48+5:302015-07-02T23:32:48+5:30
दोघांची अनामत जप्त : बेडग जिल्हा परिषद पोटनिवडणूक, शिवसेना, अपक्षाचा पराभव
मिरज : बेडग जिल्हा परिषद मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार अलकादेवी केदारराव शिंदे पाच हजारांच्या मताधिक्याने विजयी झाल्या. त्यांनी अपक्ष उमेदवार उमेश पाटील यांचा पराभव केला. चौथ्या क्रमांकावर गेलेल्या शिवसेना उमेदवारासह एका अपक्षाची अनामत जप्त झाली. तहसील कार्यालयात गुरुवारी अर्ध्या तासात मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला.काँग्रेसचे सदस्य केदारराव शिंदे यांच्या निधनामुळे बेडग मतदारसंघात ही पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीत केदारराव शिंदे यांच्या पत्नी व काँग्रेसच्या उमेदवार अलकादेवी शिंदे यांच्याविरोधात शिवसेनेचे सुलेमान मुजावर, अपक्ष उमेदवार उमेश पाटील व आप्पासाहेब मोटे यांनी निवडणूक लढविली. तहसील कार्यालयात गुरुवारी मतमोजणी झाली. या लढतीत अपेक्षेप्रमाणे काँगेसच्या उमेदवार अलकादेवी शिंदे यांना मतदारांची सहानुभूती मिळाली. शिंदे यांनी ७ हजार ६२७ मते मिळवून दणदणीत विजय मिळविला. अपक्ष उमेदवार उमेश पाटील यांना २६७९ मते मिळाली. शिंदे यांनी तब्बल पाच हजाराच्या मताधिक्याने विजय मिळविल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. शिवसेना उमेदवार सुलेमान मुजावर यांना ३०९ व अपक्ष उमेदवार आप्पासाहेब मोटे यांना ६१२ मते मिळाली. मुजावर व मोटे यांची अनामत जप्त झाली. बेडग मतदारसंघातील म्हैसाळ, विजयनगर व बेडग या गावांतील २६ हजार मतदारांपैकी ११ हजार मतदान झाले होते. निवडणुकीत म्हैसाळ व बेडग येथील मतदारांनी आपल्या गावातील उमेदवारास मताधिक्य देण्याचा प्रयत्न केला. उमेश पाटील यांना बेडगमध्ये व म्हैसाळमध्ये अलकादेवी शिंदेंना मतदारांनी मताधिक्य दिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. (वार्ताहर)
२६९ मतदारांचे नकारात्मक मतदान
बेडग पोटनिवडणुकीसाठी ४३ टक्के मतदान झाले होते. मतदारांचा अल्प प्रतिसाद मिळालेला असतानाच, २६९ मतदारांनी नकारात्मक (नोटा) मतदान नोंदविले. बेडगमध्ये ७७ व म्हैसाळमध्ये १६६ अशा २६९ मतदारांनी एकाही उमेदवारास पसंतीचे मत दिले नाही.
म्हैसाळ ग्रामपंचायतीची निवडणूक २५ जुलैला होत आहे. त्यामुळे या विजयामुळे कार्यकर्ते सक्रिय झाल्याची चर्चा आहे.
केदारराव शिंदे यांना श्रद्धांजली म्हणून गावात कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष केला नाही. फटाके, गुलाल लावणे आदी प्रकार पहायला मिळाले नाहीत.