महापालिकेच्या ‘स्थायी’चा सभापती काँग्रेसचाच करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 11:10 PM2017-08-27T23:10:19+5:302017-08-27T23:10:19+5:30

The Congress is the chairperson of 'Permanent' municipal corporation | महापालिकेच्या ‘स्थायी’चा सभापती काँग्रेसचाच करा

महापालिकेच्या ‘स्थायी’चा सभापती काँग्रेसचाच करा

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. जनतेच्या विकासासाठी वर्षभराचा कालावधी महत्त्वाचा आहे. त्यासाठी स्थायी समितीचा सभापती काँग्रेसचाच झाला पाहिजे. त्यादृष्टीने सदस्य निवडी करा, अशा स्पष्ट सूचना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी महापालिकेतील पदाधिकाºयांना दिले. दरम्यान, स्थायी समिती सदस्य निवडीबाबत कदम यांनी काँग्रेस नेत्या जयश्रीताई मदन पाटील यांच्याशी अर्धा तास चर्चा केली. काँग्रेसशी निष्ठावंत नगरसेवकांनाच संधी देण्याचा निर्णय बैठकीत झाल्याचे समजते.
स्थायी समितीतील काँग्रेसचे सहा व राष्ट्रवादीचे दोन असे आठ सदस्य ३१ आॅगस्ट रोजी निवृत्त होत आहे. या सदस्यांच्या नियुक्तीसाठी सोमवार, २८ रोजी विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या चार दिवसांपासून सदस्य निवडीच्या हालचाली गतिमान झाल्या होत्या. विशेषत: काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या अधिक असल्याने नेत्यांसमोरही पेच निर्माण झाला होता. पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणुका असल्याने स्थायी समितीत काम करण्याची ही शेवटचीच संधी आहे. त्यामुळे इच्छुकांनीही जोरदार मोर्चेबांधणी करीत नेत्यांपर्यंत आपले नाव पोहोचविण्यासाठी धडपड सुरू केली होती.
रविवारी काँग्रेसचे नेते, आमदार पतंगराव कदम सांगलीत होते. सकाळी महापौर हारुण शिकलगार, गटनेते किशोर जामदार, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी कदम यांची भेट घेतली. यावेळी महापालिका स्थायी समिती सदस्य निवडीवर चर्चा झाली. गतवर्षी स्थायी समिती सदस्य निवडीवेळी काँग्रेसची तीन मते फुटली होती. त्यामुळे अल्पमतातील राष्ट्रवादीला सभापतिपदाची लॉटरी लागली होती. यंदा मात्र पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या व कोणत्याही लाभाला न भुलणाºया सदस्यांनाच संधी देण्याची मागणी नगरसेवकांतून होत होती. या पार्श्वभूमीवर कदम यांनीही काँग्रेसचाच सभापती करण्यासाठी पदाधिकाºयांनी कंबर कसावी, असे आदेश दिले. पुढील वर्षी निवडणुका असल्याने महत्त्वाची स्थायी समिती सत्ताधाºयांच्या ताब्यात हवी. जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करायची आहेत.
सभापती निवडीत दगाफटका होऊ नये, याची खबरदारी घ्या, असे सांगत कदम यांनी निवडीबाबत सर्वांशी चर्चा करून नावे निश्चित करण्यासही सांगितले. त्यानंतर कदम यांनी विजय बंगल्यावर जयश्रीताई पाटील यांची भेट घेऊन सदस्य निवडीबाबत चर्चा केली. यावेळी महापौर हारूण शिकलगार व गटनेते किशोर जामदार हेही उपस्थित होते. यावेळी इच्छुकांची नावे मला सांगा, त्यातील कोणाला संधी द्यायचे, त्यांची नावे मी निश्चित करतो, असेही कदम म्हणाले.
जयश्रीतार्इंची नाराजी
गतवेळी सभापती निवडीत काँग्रेसचीच मते फुटल्याबद्दल जयश्रीताई पाटील यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली. कदम यांच्या सल्ल्यानेच काही सदस्यांच्या निवडी करण्यात आल्या होत्या; पण सभापती निवडीवेळी ते पक्षासोबत राहिले नाहीत, असा श्रीमती पाटील यांचा सूर होता. यावर कदम यांनी महापौर व गटनेत्यांनाही खडे बोल सुनावले. तुमच्या पसंतीचा उमेदवार नसेल तर, तुम्ही जबाबदारी घेणार नाही का? असा थेट सवालच त्यांनी दोन्ही पदाधिकाºयांना केला. तर या दोघांनी उमेदवाराबाबत सदस्यांत नाराजी असल्याचे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. अखेर कदम यांनी सभापती निवडीतही आपण स्वत: लक्ष घालणार असून, तुम्हा दोघांवर भरोसा ठेवून चालणार नाही, असेही सुनावले.
नातलगांसाठी मोर्चेबांधणी
काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश आवटी यांनी त्यांचा मुलगा निरंजन आवटी याच्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्यांनी रविवारी पतंगराव कदम व जयश्रीताई पाटील यांचीही भेट घेतली. मध्यंतरी त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती; पण गेल्या काही महिन्यांत ही चर्चा थंडावली आहे. त्यात आवटी हे मदनभाऊंचे सहकारी म्हणून ओळखले जात होते. याशिवाय माजी सभापती संजय मेंढे यांनी पत्नी बबिता मेंढे यांच्यासाठी नेत्यांना साकडे घातले आहे. माजी नगरसेवक विशाल कलकुटगी हे आई धोंडूबाई कलकुटगी यांच्यासाठी प्रयत्नशील आहेत. सांगलीतून किशोर लाटणे, माजी महापौर कांचन कांबळे, शेवंता वाघमारे, माजी सभापती संतोष पाटील, राजेश नाईक यांचीही नावे चर्चेत आहेत.

इद्रिस नायकवडींबद्दल नाराजी
कदम यांच्या बंगल्यावर प्रमुख पदाधिकाºयांची बैठक झाली. या बैठकीला माजी महापौर इद्रिस नायकवडी हेही उपस्थित होते. कदम यांनी नायकवडींना गत सभापती निवडीवेळी अनुपस्थित राहिल्याबद्दल जाब विचारला. यावर इद्रिस नायकवडी यांनी आम्हाला जयश्रीताई पाटील यांनी सभापतिपदाचा शब्द दिला होता. तो पाळला नसल्याने गैरहजर राहिल्याचे सांगितले; पण त्यावर कदम यांनी असा कुठलाही शब्द तुम्हाला श्रीमती पाटील यांनी दिला नव्हता. केवळ सदस्यपदाचा शब्द दिला होता, तो त्यांनी पाळला आहे, असे सुनावत स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली.
राष्ट्रवादीतून नऊजण इच्छुक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्यातील दोन जागांसाठी नऊजण इच्छुक आहेत. यात राजू गवळी, युवराज गायकवाड, आशा शिंदे, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, बाळासाहेब सावंत, दिग्विजय सूर्यवंशी, जुबेर चौधरी यांचा प्रामुख्याने समावेश आहे. विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते व शहर जिल्हाध्यक्ष नगरसेवक संजय बजाज यांनी इच्छुकांची नावे राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांच्याकडे सादर केली आहेत. यापैकी दोघांची नावे सोमवारी सकाळी आमदार पाटील हे शेडजी मोहिते यांच्याकडे देतील, असे सांगण्यात आले.

Web Title: The Congress is the chairperson of 'Permanent' municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.