सांगलीत काँग्रेसला भाजपचा 'दे धक्का', आमदार विक्रम सावंत पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 09:36 AM2021-11-23T09:36:48+5:302021-11-23T09:37:48+5:30
मिरजेच्या शेतकरी भवनात सकाळी आठ वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. बारा टेबलवर मतमोजणी होत असून त्यासाठी ६० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
सांगली - जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्याच फेरीत आलेल्या निकालातून काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रम सावंत यांचा पराभव झाला आहे. आमदार सावंत हे जतमधून निवडणूक लढले असून ते मंत्री विश्वजीत कदम यांचे मावसभाऊ आहेत.
मिरजेच्या शेतकरी भवनात सकाळी आठ वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. बारा टेबलवर मतमोजणी होत असून त्यासाठी ६० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. दुपारी एकपर्यंत सर्व निकाल अपेक्षित आहेत. मतमोजणी केंद्रात उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधीस परवानगी आहे. पहिल्या फेरीतील निकालानुसार, जतमधून काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत पराभूत झाले आहेत. भाजपच्या पँनेलमधील प्रकाश जमदाडे यांनी केला पराभव. आ. सावंत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असून सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे मावसभाऊ आहेत. त्यामुळे, हा पराभव काँग्रेसला मोठा धक्का मानला जातो. दरम्यान, आटपाडीतून शिवसेनेचे तानाजी पाटील विजयी झाले असून माजी आमदार राजेंद्र अण्णा पराभूत झाले आहेत.
सांगली जिल्हा बँक
तासगाव, कवठेमहांकाळ, कडेगाव, वाळवा या सोसायटी गटातील जागा महाआघाडीकडे.
अनुक्रमे बी. एस. पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, आ. मोहनराव कदम, विद्यमान अध्यक्ष दिलीपतात्या पाटील विजयी.
सांगली जिल्हा बँक
सोसायटी गट :
एकूण जागा १० ,
राष्ट्रवादी ३,
शिवसेना ३,
काँग्रेस ३,
भाजप १
एकूण ८५.३१ टक्के मतदान
जिल्हा बँकेसाठी यंदा चुरशीने ८५.३१ टक्के मतदान झाले. एकवीसपैकी तीन जागा बिनविरोध झाल्या असून १८ जागांसाठी ४९ उमेदवार रिंगणात होते. या सर्वांचे भवितव्य रविवारी मतपेटीत बंद झाले. महाविकास आघाडीचे सहकार विकास पॅनेल, तर भाजपचे शेतकरी विकास पॅनेल यांच्यात थेट लढत होत आहे. अनेक मतदारसंघात शंभर टक्के मतदान झाले आहे. सोसायटी गटासह पतसंस्था, ओबीसी या गटांमध्येही चुरस दिसून आली. त्यामुळे निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दिग्गजांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक
जिल्हा बँकेची निवडणूक दिग्गज नेत्यांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. मतदानावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्यासह आमदार, पक्षांचे प्रमुख पदाधिकारी जिल्ह्यात ठाण मांडून होते. बँकेवर प्रदीर्घ काळ जयंत पाटील यांची सत्ता आहे. यंदा काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढविली आहे. दोन्ही पॅनेलमध्ये दिग्गज नेते होते. जिल्ह्याच्या आर्थिक उलाढालीचे मोठे केंद्र म्हणून बँकेची ओळख आहे. बँकेची सूत्रे हातात रहावीत म्हणून सर्वच पक्षांच्या नेत्यांची धडपड सुरु आहे.