काँग्रेसला गटबाजीचे ग्रहण

By admin | Published: February 7, 2017 11:13 PM2017-02-07T23:13:26+5:302017-02-07T23:13:26+5:30

बंडखोरीला फूस : मिरज, जत, वाळवा, खानापूरमध्ये अंतर्गत संघर्ष

Congress eclipsed grouping | काँग्रेसला गटबाजीचे ग्रहण

काँग्रेसला गटबाजीचे ग्रहण

Next

सांगली : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढविण्याचे रणशिंंग फुंकणारी काँग्रेस ऐन रणधुमाळीत बदलली. उमेदवारी निश्चित करण्यावरून नेत्यांची गटबाजी उफाळून आली. जत, मिरज, खानापूर आणि वाळवा तालुक्यात काँग्रेसअंतर्गत गटबाजीचे दर्शन झाले. यातून नेत्यांचीच बंडखोरीस फूस असल्याचेही दिसून आले.
जिल्हा परिषदेत सध्या राष्ट्रवादीची सत्ता असून त्यांच्या पक्षाला गळती लागली आहे. विधानपरिषद निवडणुकीनंतर काँग्रेसचे मनोबल उंचावले आहे. विरोधी बाकावर असलेल्या काँग्रेसला सत्तेचे डोहाळे लागले. निवडणुकीपूर्वी काँग्रेसला जिल्ह्यात चांगले वातावरण निर्माण झाले होते. सत्तेच्या जवळपास जाणार असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत बनले. मात्र ऐन निवडणुकीत काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आल्यामुळे गणित बिघडत चालल्याचे चित्र आहे.
काँग्रेसचे नेते माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम व प्रदेश उपाध्यक्ष सदाशिवराव पाटील, जयश्रीताई पाटील व विशाल पाटील, वाळव्यात सी. बी. पाटील, सत्यजित देशमुख व जितेंद्र पाटील, जतमध्ये विक्रम सावंत आणि सुरेश शिंंदे यांच्यातील अंतर्गत वादामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेस बॅकफूटवर गेली. नेत्यांचे विरोधकांशी साटेलोटे झाल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे चित्र दिसत आहे.
मिरज तालुक्यात काँग्रेसप्रेमींची संख्या जास्त आहे. मात्र जयश्रीताई आणि विशाल पाटील यांच्यातील वाद विकोपाला गेला. जयश्रीतार्इंना जिल्हा परिषदेच्या तीन जागा व सहा पंचायत समितीच्या जागा देण्याचे ठरले. मात्र त्यांच्या जागेवर विशाल गटाने तेथे उमेदवार लादण्याचा प्रयत्न केल्याचा जयश्रीताई म्हणजे मदनभाऊ गटाच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्याक्षणी त्यांच्यातील वाद मिटला.
पंचायत समितीचे सदस्य अशोक मोहिते यांनी समडोळी पंचायत समितीसाठी दावेदारी सांगितली होती. डॉ. कदम गटाने त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. मात्र विशाल पाटील, जयश्रीताई पाटील यांनी हरिपुरातीलच संजय सावंत यांना तिकीट दिले. पाटील विरुद्ध मोहिते यांच्यातील वाद थेट प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचला. तरीही येथील वाद मिटला नसून आता मोहिते-पाटील गट एकमेकाविरोधात लढत आहेत.
एरंडोली जिल्हा परिषद गटातून संगीता खुळे यांनी काँग्रेस उमेदवाराविरोधात बंडखोरी केली आहे. यांना काँग्रेस उमेदवाराचे छुपे बळ मिळणार असल्याची चर्चा आहे. खानापूर तालुक्यात प्रदेश उपाध्यक्ष सदाशिवराव पाटील यांनी राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यासाठी प्रयत्न ठेवला होता. आटपाडी तालुक्यातही आघाडी केल्यास फायदा होईल, असे मत होते. खानापुरात शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांच्याशी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम गटाचे साटेलोट असल्याचा स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांचा आरोप आहे.
याच वादातून आपल्या गटाचे उमेदवार पक्षाच्या चिन्हावर उभे न करण्याचा निर्णय सदाशिवराव पाटील गटाने घेतला. तेथे केवळ भाळवणीमध्ये काँग्रेसच्या महिला उमेदवार एबी फॉर्म घेऊन लढत आहेत. त्यांच्याविरोधात सदाशिवराव पाटील गटाने दुसरा उमेदवार दिला आहे. पाटील गटाचे सर्व उमेदवार पक्षाच्या चिन्हाशिवाय लढणार आहेत.(प्रतिनिधी)

Web Title: Congress eclipsed grouping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.