मिरज तालुक्यात काँग्रेसला भाजपचे कडवे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 12:09 AM2017-09-08T00:09:24+5:302017-09-08T00:10:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : मिरज तालुक्यातील ३८ गावांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी राजकीय मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मिरज पूर्व भागात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत मोठे यश मिळविणाºया भाजप विरूध्द काँग्रेस व पश्चिम भागात राष्टÑवादी विरूध्द काँग्रेस व स्वाभिमानी आघाडी अशी लढत होणार आहे. मतदार सरपंचांची थेट निवड करणार असल्याने अनेक गावांतील राजकीय समीकरणे बदलली आहेत.
तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने निवडणूक आचारसंहिता जाहीर झाली आहे. मिरज पूर्व भागातील बेडग, गुंडेवाडी, बोलवाड, खटाव, कदमवाडी, खंडेराजुरी, बेळंकी, सावळी, टाकळी, सलगरे, वड्डी, संतोषवाडी, पाटगाव, सिध्देवाडी, पायापाचीवाडी, सोनी, करोली-एम, मिरज पश्चिम भागातील दुधगाव, हरिपूर, जानराववाडी, कसबे डिग्रज, कनडवाडी, खरकटवाडी, काकडवाडी, बुधगाव, बिसूर, माधवनगर, मौजे डिग्रज, माळवाडी, मानमोडी, नरवाड, नांद्रे, सावळवाडी, समडोळी, पद्माळे, रसूलवाडी, सांबरवाडी, बामणोली या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी यापूर्वीच विविध राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
मिरज पूर्व भागात काँग्रेसच्या मदन पाटील गटाचे वर्चस्व होते. मात्र पूर्व भागात पंचायत समितीच्या दहा व जिल्हा परिषदेच्या चार जागा जिंकून भाजपने येथे वर्चस्व निर्माण केले आहे. काँग्रेस व राष्टÑवादीच्या अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी खा. संजय पाटील व आ. सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केल्याने, पूर्व भागातील काही ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता आहे. यावेळी ग्रामपंचायतीसाठी भाजप विरूध्द काँग्रेस अशी लढत होणार आहे. काही गावात अस्तित्व असलेली अजितराव घोरपडे यांची विकास आघाडी कोणाला साथ देणार, याबाबत अद्याप अनिश्चितता आहे.
मदन पाटील यांच्या पश्चात काँग्रेस गट नेतृत्वहीन झाला आहे. काँग्रेसच्या विशाल पाटील गटाचे घोरपडे यांच्या विकास आघाडीशी सख्य आहे. अशा परिस्थितीत भाजपचा सामना करण्याचे काँग्रेससमोर आव्हान आहे.
राष्टÑवादीचे वर्चस्व
मिरज पश्चिम भागात राष्टÑवादीचे वर्चस्व आहे. येथे काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र येऊन राष्टÑवादीला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस राष्टÑवादीच्या तुलनेत भाजपची ताकद अपुरी आहे. सरपंचांची थेट मतदारातून निवड होणार असल्याने, अनेक गावांतील समीकरणे बदलली आहेत. सरपंच पदासाठी चाचपणी सुरू झाली आहे.