घड्याळाच्या मदतीला काँग्रेसचा हात!

By admin | Published: February 28, 2017 12:49 AM2017-02-28T00:49:34+5:302017-02-28T00:49:34+5:30

जिल्हा परिषदेचे सत्ताकारण : मोहनराव कदम यांचा प्रस्ताव; राष्ट्रवादीने पुढाकार घेण्याचे आवाहन

Congress hands to watch the clock! | घड्याळाच्या मदतीला काँग्रेसचा हात!

घड्याळाच्या मदतीला काँग्रेसचा हात!

Next


सांगली : जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही एका पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम यांनी सत्ता स्थापण्यासाठी राष्ट्रवादीला मदतीचा हात देण्याचे सोमवारी स्पष्ट केले. यामुळे सत्तेसाठीच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपच्या नेत्यांनीही सावध पवित्रा घेत रयत विकास आघाडी, शिवसेना, माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाशी बोलणी सुरू ठेवली आहेत.
जिल्हा परिषदेत सर्वाधिक मोठा पक्ष भाजप असून त्यांच्याकडे २५ सदस्य आहेत. राष्ट्रवादी १४, काँग्रेस १०, रयत विकास आघाडी चार, शिवसेना तीन, माजी मंत्री अजितराव घोरपडे गट दोन, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अपक्ष प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल आहे. बहुमत सिध्द करण्यासाठी ३१ सदस्य संख्येची गरज आहे. भाजपला इतरांची मदत घेतल्याशिवाय बहुमत सिध्द करता येणार नाही, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही सत्तेसाठी शिवसेना, रयत विकास आघाडी, अजितराव घोरपडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मदत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यात पेच निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम म्हणाले की, जिल्हा परिषदेत भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकाची सदस्यसंख्या राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी सत्ता स्थापण्यासाठी प्रयत्न करावेत. मी आणि माझा पक्ष त्यांना सत्ता मिळवून देण्यासाठी मदत करू. अजितराव घोरपडे, रयत विकास आघाडी, शिवसेना यांच्याशी चर्चा केल्यास ते निश्चित आमच्याबरोबर येतील. जिल्ह्याच्या विकासासाठी या आघाडीचीच गरज आहे.
मोहनराव कदम यांनी मदतीचा हात पुढे केला आहे, परंतु या प्रस्तावाचा जयंत पाटील किती गांभीर्याने विचार करतात, यावर सारे अवलंबून आहे. जयंत पाटील यांनी निवडणुकीत काँग्रेसकडे आघाडीचा प्रस्ताव दिला होता, पण तो मोहनराव कदम यांनी फेटाळला होता.
यावरूनही पाटील आणि कदम यांच्यामध्ये दरी निर्माण झाली होती. शिवसेना आमदार अनिल बाबर यांचे मोहनराव कदम आणि जयंत पाटील यांच्याशी चांगले संबंध आहेत. कदम हे बाबर यांच्याशी रोजच दूरध्वनीवरून संपर्क करून राजकीय घडामोडीची चर्चा करतात. कदम यांच्याबरोबरच भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचाही बाबर यांच्याशी चांगला संपर्क आहे. त्यामुळे बाबर घड्याळ आणि हाताला जवळ आणण्यासाठी प्रयत्न करणार, की भाजपला पाठिंबा देऊन देशमुखांची मैत्री संभाळणार, हे येत्या आठ दिवसात निश्चित होणार आहे. दि. २१ मार्च रोजी जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड होणार असल्यामुळे सध्या सर्वच पक्षांची चर्चा संथगतीने चालू आहेत. (प्रतिनिधी)
अद्याप कोणाशीही चर्चा नाही : बाबर
जिल्हा परिषदेत त्रिशंकू परिस्थिती असून, यामध्ये कोणालाही बहुमत नाही. सत्ता स्थापन करण्याचा पेच निर्माण झाला आहे, पण याबाबत माझ्याशी आतापर्यंत कोणत्याही पक्षाने चर्चा केलेली नाही. ज्यावेळी प्रस्ताव येईल, त्यावेळी कार्यकर्त्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल, असे मत शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी व्यक्त केले. बहुमत नसल्यामुळे कुठल्याही पक्षाला ‘ब्लॅकमेल’ करणार नाही, असेही बाबर यांनी स्पष्ट केले.
रयत आघाडीची दोन
दिवसांत बैठक : शेट्टी
जिल्हा परिषदेत रयत विकास आघाडीचे चार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक असे आमचे पाच सदस्य आहेत. या सदस्यांसह मंत्री सदाभाऊ खोत व रयत विकास आघाडीच्या अन्य नेत्यांची येत्या दोन दिवसात बैठक घेऊन, कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा, याचा निर्णय घेऊ. सदाभाऊ खोत आमच्या बरोबरच आहेत, असे खा. राजू शेट्टी यांनी सांगितले.

Web Title: Congress hands to watch the clock!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.