काँग्रेसचे सांगलीत ‘मोदी हटाव’ टपाल आंदोलन; टपालपेटीत शेकडो पत्रे
By अविनाश कोळी | Published: April 6, 2023 07:49 PM2023-04-06T19:49:45+5:302023-04-06T19:50:08+5:30
पोस्ट कार्यालयासमोर निदर्शने: टपाल पेटीत टाकली शेकडो पत्रे
सांगली : ‘मोदी हटाओ, लोकशाही बचाओ’, ‘मोदी हटाव, देश बचाओ’ अशा घोषणा देत तशा आशयाची पत्रे लिहून सांगली जिल्हा काँग्रेसच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांच्या नावे शेकडो पत्रे टपालपेटीत टाकली.
सांगलीच्या मारुती चौकातील पोस्ट कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने गुरुवारी सायंकाळी निदर्शने करण्यात आली. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्रे पाठवली. यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले, या देशात अनेक मोठे घोटाळे करणारे मोकाट सुटले आहेत. त्यांच्यावर मोदी सरकार कारवाई करत नाही. वाढलेली प्रचंड महागाई कमी केली जात नाही. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांसह अनेक महापुरुषांचा अवमान भाजपचे नेते करीत आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. महाराष्ट्रातील बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला असताना त्याकडे सरकार डोळेझाक करीत आहे. लोकशाहीतून देश हुकूमशाहीच्या वाटेवर नेण्याचे काम नरेंद्र मोदी करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या हुकूमशाही कारभाराचा आम्ही निषेध करीत आहोत.
आंदोलनात महापालिका विरोधी पक्षनेता संजय मेंढे, आशिष कोरी, सनी धोतरे, बिपीन कदम, देशभूषण पाटील, आशा पाटील, सुवर्णा पाटील, नंदा कोलप, बाबगोंडा पाटील, अजित दोरकर, आयुब निशानदार, अमित पारेकर, अरविंद पाटील, नाना घोरपडे, महावीर पाटील, मनोज पवार, नामदेव चव्हाण, संजय मेथे, प्रशांत अहिवळे, राजेंद्र कांबळे, अनिल पवार, सुभाष यादव, मंदार काटकर, अल्बर्ट सावर्डेकर, विश्वास यादव, पैगंबर शेख, मौलाली वंटमुरे, योगेश जाधव, आशिष चौधरी सहभागी होते.