कॉँगे्रसचे घर तरी दुरुस्त करायलाच हवे
By admin | Published: December 3, 2015 12:46 AM2015-12-03T00:46:01+5:302015-12-03T00:49:16+5:30
पतंगराव कदम : जिल्ह्यात पक्षाला पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करणार
सांगली : राज्य पातळीवर राष्ट्रवादी या मित्रपक्षासोबत काम करण्याचा विचार आता सुरू झाला आहे. त्या निर्णयावर जिल्ह्यातील वाटचालही अवलंबून आहे. आघाडी झाली तर ठीक, नाही तर कॉँग्रेसचे घर तरी दुरुस्त करावेच लागेल, असे मत माजी मंत्री आ. पतंगराव कदम यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
ते म्हणाले की, हा जिल्हा वसंतदादा व राजारामबापूंचा आहे. दोन्ही नेत्यांनी त्यांच्या काळात हा जिल्हा एकसंध ठेवला होता. पुन्हा तशीच ताकद या जिल्ह्यात निर्माण करायची आहे. वरिष्ठ पातळीवर आता विरोधक म्हणून काम करताना राष्ट्रवादीला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. निर्णय झालाच तर, त्याची अंमलबजावणी जिल्ह्यातही केली जाईल. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याशी यासंदर्भात चर्चासुद्धा झाली आहे. स्वतंत्रपणे काम करायचा निर्णय झाला तर, जिल्ह्यात कॉँग्रेसचे संघटन पुन्हा पूर्वीसारखे करण्यासाठी प्रयत्न केले जातील. निवडणुकांपूर्वी पक्षाचे जिल्ह्यातील घर तरी दुरुस्त करावेच लागेल.
जिल्ह्यात आगामी काळात तासगाव, आष्टा, इस्लामपूर आणि विटा या नगरपालिकांच्या निवडणुका आहेत. मित्रपक्षासोबत जाण्याचा निर्णय झाला तर, तशापद्धतीने निवडणुका लढविल्या जातील, अन्यथा स्वतंत्रपणे आम्ही या निवडणुका लढू. जिल्ह्यापासून राष्ट्रापर्यंत सर्वत्र पक्षाचे एकच सूत्र असले पाहिजे. मित्रपक्षासोबत काम केल्यास जोमाने संघटन वाढविता येईल. हिवाळी अधिवेशनानंतर महापालिकेतील कॉँग्रेस नगरसेवकांची बैठक घेतली जाईल. त्यांचे प्रश्न सोडविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
दुष्काळी प्रश्नाबाबत ते म्हणाले की, राज्यातून दुष्काळप्रश्नी एकही आदेश अद्याप जिल्हापातळीवर आला नाही. शासनाकडे कोणताही अॅक्शन प्लॅन नाही. सर्वप्रकारचे बजेट बाजूला करून दुष्काळग्रस्तांना मदत करणे आवश्यक आहे. सांडगेवाडी, पलूस येथील औद्योगिक वसाहतीत फळप्रक्रिया आणि उत्पादनाला चालना मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)