Congress Jan Sangharsh Yatra भाजपने गरिबांचा घासही काढून घेतला : राधाकृष्ण विखे-पाटील - जत येथे जनसंघर्ष यात्रेत काँग्रेस नेत्यांचा सरकारवर हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 12:19 AM2018-09-03T00:19:42+5:302018-09-03T00:23:14+5:30
गेल्या साडेचार वर्षात शासनाने असंख्य प्रश्न या राज्यात निर्माण केले. गरिबांच्या तोंडातील घास काढून घेण्याचे पापही शासनाने केले, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रविवारी जत येथे केली.
जत : गेल्या साडेचार वर्षात शासनाने असंख्य प्रश्न या राज्यात निर्माण केले. गरिबांच्या तोंडातील घास काढून घेण्याचे पापही शासनाने केले, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रविवारी जत येथे केली.
जत तालुका काँग्रेसतर्फे जनसंघर्ष यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर दुय्यम बाजार आवार परिसरात सभा पार पडली. विखे-पाटील म्हणाले की, पैसे वाटा आणि निवडून या, असा एकमेव कार्यक्रम शासन सध्या राबवत आहे. त्याला जनतेने बळी पडू नये. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही याबाबत सतर्क राहावे. शासन शेतकऱ्यांना हमीभाव देत नाही.परंतु हमीभाव न देणाºया व्यापाºयांवर कारवाईसाठी कायदा करत आहे. शेतकºयांना मदत मिळवून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.
अशोक चव्हाण म्हणाले की, पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा मिळविण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांचे शेवटचे हत्यार जातीयवाद हे आहे. भाजप हा देशाला लागलेला भयंकर कॅन्सर आहे. देश व राज्य कॅन्सरमुक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे. आगामी निवडणुकीत अमाप पैसा ओतून परत सत्तेत येण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यासाठी मतदार यादीत गोंधळ घालण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. चार वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणूक प्रचारात धनगर समाजाला आरक्षण देतो, असा शब्द देऊनही भाजपने तो पाळला नाही. मराठा समाजाच्या तोंडालाही पाने पुसली आहेत.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राज्य सरकार प्रत्येक क्षेत्रात अपयशी ठरत आहे. महिला व दलितांवरील अत्याचारात वाढ होत आहे. लोकशाही पध्दतीने निवडणुका होत नाहीत. घटनेचा अवमान करणाºया सरकारला हद्दपार करा. विश्वजित कदम म्हणाले की, जत मतदारसंघ काँग्रेस पक्षाला मानणारा आहे. डॉ. पतंगराव कदम यांची उणीव भरून काढण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. राज्यात आघाडी असो वा नसो, परंतु जत विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा उमेदवार उभा करून तो निवडून आणला जाईल.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, पतंगराव कदम यांनी गुड्डापूर (ता. जत) येथे पाणी परिषद घेऊन तालुक्यात परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला. कर्नाटकात आमचेच शासन आहे. यापुढील काळात कर्नाटकातून सीमाभागात पाणी आणण्यासाठी प्रयत्न केले जातील.
जत तालुका काँग्रेसचे नेते विक्रम सावंत म्हणाले की, तालुक्यातील पाण्याचा प्रश्न आजवर निकालात निघाला नाही. त्याला सर्वस्वी आमदार विलासराव जगताप कारणीभूत आहेत. तालुक्यातील बावीस गावांतील नागरिकांनी टँकरद्वारे पिण्यासाठी पाणी मिळावे, अशी मागणी करूनही त्यांना अद्याप टँकर मिळालेला नाही.
यावेळी आमदार बसवराज पाटील, आमदार मोहनराव कदम, आमदार शरद रणपिसे, माजी आमदार उमाजी सनमडीकर, नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवार, शैलजा पाटील, विशाल पाटील, पी. एम. पाटील, बाबासाहेब कोडग, दिग्विजय चव्हाण, अभिजित चव्हाण, आप्पासाहेब मासाळ, आकाराम मासाळ, चारुताई टोकस, संतोष पाटील, पृथ्वीराज पाटील, रामगोंडा संत्ती, महादेव पाटील, नाथा पाटील, काका शिंदे, रवींद्र सावंत, इकबाल गवंडी, महादेव कोळी, साहीबू कोळी, ईराण्णा निडोणी, अशोक बन्नेनवार, मुन्ना पखाली, यशवंत हप्पे आदी उपस्थित होते.
तालुकाध्यक्ष आप्पासाहेब बिराजदार यांनी स्वागत केले, तर सुजय शिंदे यांनी आभार मानले.
जत विधानसभेसाठी ताकद देऊ!
सभेत जत विधानसभेचा मुद्दा अनेक नेत्यांनी उपस्थित केला. आमदार सतेज पाटील म्हणाले की, जत विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे राहावा, यासाठी प्रदेशाध्यक्षांनी प्रयत्न करावेत. येथील भाजप आमदारांचे कर्तृत्व जनतेला माहिती आहे. विधानसभा प्रचाराचा नारळ फोडला आहे, असे समजून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. तोच धागा पकडत अशोक चव्हाण म्हणाले की, जत विधानसभेची जागा काँग्रेसच्या पारड्यात पाडणार असून, त्यासाठी वैयक्तिक लक्ष देणार आहे.
जत येथील सभेत अशोक चव्हाण यांनी भाषण केले. यावेळी डावीकडून शुभांगी बन्नेनवार, आ. विश्वजित कदम, आ. सतेज पाटील, पृथ्वीराज चव्हाण, आ. मोहनराव कदम, राधाकृष्ण विखे-पाटील, हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.