राष्ट्रवादीबाबत योग्यवेळी कठोर निर्णय घेऊ, काँग्रेसच्या माजी मंत्र्याने दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 01:11 PM2022-10-15T13:11:36+5:302022-10-15T13:12:05+5:30
पक्षाचे नगरसेवक निवडणुकीसाठी का येत नाहीत? याचे आत्मपरीक्षण राष्ट्रवादीने करावे.
सांगली: महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन सदस्य गैरहजर होते. पक्षाचे नगरसेवक निवडणुकीसाठी का येत नाहीत? याचे आत्मपरीक्षण राष्ट्रवादीने करावे. काँग्रेस नगरसेवकांच्या राष्ट्रवादीबाबत अनेक तक्रारी आहेत. योग्यवेळी आम्ही कठोर निर्णय घेऊ, असा इशारा काँग्रेसचे नेते आ. डाॅ. विश्वजित कदम यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिला. सांगली लोकसभेची जागा ही काँग्रेसचीच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात येणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यानंतर कदम पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असताना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जिल्हाध्यक्ष आ. विक्रम सावंत यांचा पराभव झाला. त्यावेळी आम्ही आत्मपरीक्षण केले, राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही आत्मपरीक्षण करायला सांगितले. आता महापालिकेच्या स्थायी सभापती निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन सदस्य गैरहजर राहिले होते. महत्त्वाच्या निवडणुकीत पक्षाचे सदस्य गैरहजर कसे राहतात? याचे आत्मपरीक्षण राष्ट्रवादीने करावे. नगरसेवकांच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे भविष्यात कठोर निर्णय घेतले जातील.
सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा आहे. त्या परिस्थितीत राज्यातील ज्येष्ठ नेत्यांनी ही जागा सोडण्याचा निर्णय घेतला होता. याचा अर्थ हा मतदारसंघ सोडला, असा नाही. हा मतदारसंघ काँग्रेसचाच आहे. जिल्ह्यात काँग्रेस स्वावलंबी असून, ताकदीचा पक्ष आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना जिल्ह्यात पक्षाच्यावतीने पदयात्रा काढली. ताकद कमी असलेल्या भागातही काँग्रेसला चांगला प्रतिसाद मिळाला. भविष्यात पक्ष वाढीवर आणखी भर दिला जाईल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेसतर्फे ताकदीने लढल्या जातील, असे कदम यांनी स्पष्ट केले. काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे व शशी थरूर यांच्यात लढत आहे. खर्गे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही ते म्हणाले.
भाजप प्रवेशाला पूर्णविराम
विश्वजित कदम भाजपमध्ये प्रवेश करणार, अशा बातम्या सांगली ते मुंबईपर्यंत पेरल्या जात आहेत. त्याला आता उत्तर देण्याची गरज नाही. अंकलखोप येथील जाहीर सभेत खुलासा झाला आहे. त्यामुळे भाजप प्रवेशाच्या बातम्यांना आता पूर्णविराम मिळेल, असेही कदम म्हणाले.