सर्वोच्च न्यायालयाचे चाललंय तरी काय? काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2022 10:25 PM2022-08-03T22:25:47+5:302022-08-03T22:26:42+5:30
योग्य न्याय झाला असे आम्हाला वाटत नाही, असेही ते म्हणाले.
अविनाश कोळी। लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सुटी दिवशी दिलेला निर्णय अचंबित करणारा आहे. योग्य न्याय झाला असे आम्हाला वाटत नाही. त्यामुळे न्यायदेवतेने कायद्याचे अचूक विश्लेषण करुन न्याय देणे अपेक्षित आहे, असे मत काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
चव्हाण म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींनी यापूर्वी सुटीच्या दिवशी जो निर्णय दिला तो अचंबित करणारा होता. सदस्यांच्या निलंबनाची कारवाई प्रलंबित असताना मुख्यमंत्र्यांना शपथ देणे चुकीचे होते. एकदा मुख्यमंत्र्यांना शपथ दिल्यानंतर अध्यक्ष निवड व अन्य प्रक्रिया होऊन गेली आहे. आता सर्वोच्च न्यायालय हे सगळे घड्याळ उलटे फिरवणार आहे का? त्यामुळे सुप्रिम कोर्टाचे नेमके काय चालले आहे, हे समजत नाही. आमची व जनतेची प्रामाणिक अपेक्षा आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जे घटनेमध्ये अभिप्रेत होते त्यानुसार कायद्याचे अचूक विश्लेषण करुन योग्य अर्थ लावून न्यायालयाने न्याय द्यावा. तो न्याय झालेला दिसत नाही. त्यामुळे यापुढे घटनापीठ ज्यावेळी बसेल त्यावेळी मुलभूत गोष्टींचा विचार करुन निवाडा करेल, अशी आशा आहे.
"महाराष्ट्रातील परिस्थिती सुधारेल व घोडेबाजार थांबेल, अशीही आशा आहे. असा घोडेबाजार होणे, ही लाजीरवाणी गोष्ट आहे. त्यास मोदी सरकारच जबाबदार आहे. आतापर्यंत साडे पाच हजार लोकांविरोधात ईडीची कारवाई झाली, त्याचा निकाल काय लागला? भाजपच्या लोकांच्या संस्था मात्र धुतल्या तांदळासारख्या आहेत, असे समजून त्यांच्यावर धाडी टाकल्या जात नाहीत. त्यामुळे संविधानच आता धोक्यात आले आहे. देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने सुरु आहे. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही विरोधी पक्ष संपविण्याचे वक्तव्य करुन त्याबाबतचे संकेत दिले आहेत. त्यामुळे जनतेनेच आता सावध व्हायला हवे", असेही ते म्हणाले.