सांगली महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे नेतृत्व जयश्रीतार्इंकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 11:45 PM2018-03-29T23:45:43+5:302018-03-29T23:45:43+5:30
सांगली : पतंगराव कदम, मदनभाऊ पाटील यांची उणीव भासणार असली तरी, कॉँगेस पक्ष महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आहे. जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकसंधपणे
सांगली : पतंगराव कदम, मदनभाऊ पाटील यांची उणीव भासणार असली तरी, कॉँगेस पक्ष महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आहे. जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकसंधपणे या निवडणुकीला सामोरे जाऊया. कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आदेश युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी दिले. १५ एप्रिलनंतर प्रभागनिहाय बैठका घेऊन इच्छुकांची चाचपणी सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिका निवडणुकीसाठी बुधवारी पुणे येथे विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत कॉँग्रेस नेत्यांची बैठक झाली. यावेळी महापौर हारुण शिकलगार, गटनेते किशोर जामदार, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, नगरसेवक राजेश नाईक, संतोष पाटील आदी उपस्थित होते.महापालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रभाग रचना व आरक्षण सोडतीची माहिती कदम यांनी घेतली. राजकीय आढावाही यावेळी घेण्यात आला.
कदम म्हणाले की, या निवडणुकीत पतंगराव कदम व मदनभाऊ पाटील यांची उणीव पक्षाला मोठ्याप्रमाणात भासणार आहे. तरीही कॉँग्रेस पक्ष निवडणूक पूर्ण ताकदीने लढेल. पक्षाच्यावतीने उमेदवारांना ताकद देण्यात येईल. गेल्या पाच वर्षांतील विकासकामांच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जाऊ. जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होणार आहे; मात्र सर्वच कॉँग्रेसचे स्थानिक व प्रदेशचे नेते निवडणुकीत सक्रिय असतील.
१५ एप्रिलनंतर मी स्वत:, जयश्रीताई पाटील, माजी खासदार प्रतीक पाटील, महापौर व पक्षाचे अध्यक्ष, आजी-माजी नगरसेवक प्रभागनिहाय बैठका घेऊन इच्छुकांची चाचपणी करणार आहोत. दोन टप्प्यात आपण प्रभागनिहाय बैठका घेणार आहोत.
पोटनिवडणुकीचीही तयारी
पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात मे महिन्यात पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगानेही या बैठकीत चर्चा झाली. महापालिका निवडणुकीसाठी एप्रिलच्या १५ तारखेनंतर प्रभागनिहाय बैठका घेतल्यानंतर लगेचच आपण पलूस-कडेगावमध्ये वेळ देणार आहोत. पण पोटनिवडणुकीमुळे महापालिका निवडणुकीकडे दुर्लक्ष करणार नसल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.
पक्षाची कोअर कमिटी सर्व निर्णय घेणार
कॉँग्रेसच्या परंपरेप्रमाणे महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेणे, त्यांची नावे निश्चित करणे या प्रक्रियेसाठी कोअर कमिटी नेमण्यात येणार आहे. यात पक्षाचे अध्यक्ष, पक्षनिरीक्षक, महापौर, केंद्रीय समिती सदस्य, प्रदेश सदस्य, माजी खासदार आदींचा समावेश आहे.