काँग्रेसच्या नेत्यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 01:13 AM2017-11-14T01:13:43+5:302017-11-14T01:14:24+5:30
सांगली : अनिकेत कोथळे याचा पोलिसांनीच पोलिस कोठडीत खून करून त्याचा मृतदेह आंबोली घाटात जाळल्याच्या प्रकरणात गृहखात्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोमवारी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, पोलिसांनी सुपारी घेऊन ही हत्या केल्याचा संशय व्यक्त केला.
राज्यातील गृहखाते एकीकडे एका गरीब तरुणाच्या हत्येची सुपारी घेते, तर दुसरीकडे अपहरणाची तक्रार असूनही शिवसेनेच्या एका आमदाराला अभय देते. यातूनच सरकारचे खरे रूप समोर येत आहे, अशी टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.
ते म्हणाले की, मुंबईत काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे आ. प्रकाश सुर्वे यांच्यावर एका तरुणाने अपहरणाची तक्रार केली होती. सत्तेतील घटकपक्षाचा आमदार म्हणून गृहखात्याने या प्रकरणात आलेल्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही. धनदांडग्या लोकांना एकीकडे गृहखाते अभय देत असतानाच, सांगलीत एका गरीब युवकाचा कोठडीत खून करण्यात येतो, ही बाब दुर्दैवी आहे. पोलिस आता सुपारी घेऊन काम करू लागल्याचे चित्रही राज्याने पाहिले आहे. अशा गोष्टींना आता राज्य शासनाने लगाम घालायला हवा.
सुपारी घेऊन एन्काऊंटरचा संशय : पृथ्वीराज चव्हाण
अनिकेत कोथळेचा कोठडीत केलेला खून आहे की सुपारी घेऊन पोलिसांनी केलेला एन्काऊंटर आहे, याविषयीची शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे गृहखात्याची जबाबदारी असलेल्या मुख्यमंत्र्यांनी गंभीरपणे पाहावे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. चव्हाण यांनी सोमवारी सकाळी आमदार डॉ. पतंगराव कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह अनिकेत कोथळे याच्या कुटुंबीयांची भेट घेतली, यावेळी ते बोलत होते. याप्रकरणी राज्य व केंद्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे चव्हाण यांनी कोथळे कुटुंबीयांना सांगितले.
थोडी जरी चाड असेल, तर मुख्यमंत्र्यांनी लवकर यावे!
एवढी घटना घडूनही मुख्यमंत्री मौन बाळगून आहेत. पालकमंत्र्यांनाही या प्रकरणाकडे पाहावेसे वाटत नाही. त्यांना वेळसुद्धा नाही. मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना आता थोडी जरी चाड असेल, तर त्यांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घालावे, अशी टीका विखे-पाटील यांनी केली.
नोकरी देऊ : कदम
अनिकेतच्या नातेवाईकांनी त्याच्या पत्नीला नोकरी देण्याबाबत गृहराज्यमंत्र्यांकडे मागणी केल्याचे सांगितले. परंतु नोकरी देता येणार नाही, असे केसरकरांनी सांगितले. शासन काय करते ते पाहू, अन्यथा अनिकेतच्या पत्नीला आम्ही नोकरी देऊ, असे आश्वासन आ. पतंगराव कदम यांनी दिले.