काँग्रेस नेत्यांची खुमखुमी उतरविणार

By admin | Published: January 3, 2017 11:30 PM2017-01-03T23:30:21+5:302017-01-03T23:30:21+5:30

जयंत पाटील : जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीची ताकद दाखवून देऊ

Congress leaders will be excited | काँग्रेस नेत्यांची खुमखुमी उतरविणार

काँग्रेस नेत्यांची खुमखुमी उतरविणार

Next

सांगली : एकट्याच्या जोरावर आमच्याशी लढता येत नसल्याने सगळे मिळून लढत आहेत. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसची खुमखुमी राष्ट्रवादीच उतरवेल, असा इशारा आ. जयंत पाटील यांनी मंगळवारी राष्ट्रवादीच्या बैठकीत दिला. जिल्ह्यातील पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात पार पडली. यावेळी ते बोलत होते.
पाटील म्हणाले की, माझ्याविरोधात वाळवा तालुक्यात सर्व पक्ष एकवटले आहेत. प्रत्येकाला त्यांची स्वतंत्र ताकद किती आहे याची कल्पना आहे. राष्ट्रवादीशी स्वतंत्रपणे मुकाबला करण्याचे धाडस एकाही पक्षाकडे नाही. त्यामुळे सगळे एकत्र येऊन लढणार आहेत. एकटे आले किंवा सगळे आले तरी आता काहीही फरक पडणार नाही. आम्ही सर्वांना त्यांची जागा दाखवून देऊ.
एखादा मतदारसंघ वगळता राष्ट्रवादीची ताकद संपूर्ण जिल्हाभर आहे. याउलट दोन मतदारसंघ वगळता काँग्रेसची ताकद कुठेही नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची खुमखुमी उतरविली जाईल. राष्ट्रवादीने कोणताही प्रस्ताव ठेवला नसताना, काँग्रेसचे नेते आघाडी अमान्य करीत आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ताकदीने निवडणुका लढविण्याचे ठरविले, तर कोणत्याही पक्षाचा आमच्यासमोर निभाव लागणार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता निवडणुकीसाठी सज्ज राहावे. महिन्याभरात जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या गावांमध्ये सभांचे नियोजन करण्यात आले आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्याबाबतची माहिती दिली जाईल. ज्या मतदार संघातील राष्ट्रवादीची ताकद कमी आहे असे वाटते, त्याठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देऊन आम्ही लढणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत ही लढाई जिंकण्याचा निर्धार सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला पाहिजे, असे ते म्हणाले.
बैठकीस इलियास नायकवडी, अरुण लाड, जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील, पद्माकर जगदाळे, बाळासाहेब होनमोरे, ताजुद्दीन तांबोळी, वैभव शिंदे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नोटाबंदी : राष्ट्रवादीचा ९ रोजी मोर्चा
नोटाबंदीच्या निर्णयाला पन्नास दिवस पूर्ण झाल्यानंतरही अद्याप शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, व्यापारी आणि अन्य घटकांचा त्रास कमी झालेला नाही. त्यामुळे शासनाच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीच्यावतीने ९ जानेवारीस सांगलीत मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी कार्यालयापासून सकाळी साडेअकरा वाजता मोर्चास सुरुवात होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
सदाभाऊ खोत, राजू शेट्टींचा निषेध

नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कोणताही त्रास झाला नाही, असे वक्तव्य करणाऱ्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी यांचा निषेध बैठकीत करण्यात आला.
द्वेष करता तरी किती?
जयंत पाटील म्हणाले की, माझा द्वेष किती करायचा, याला मर्यादा आहे की नाही? हे द्वेषाचे राजकारण किती दिवस चालणार आहे? सर्वपक्षीय आघाडीही याच द्वेषापोटी झाली. आम्ही कडेगाव, पलूसमध्ये तसे ठरवले असते, तर काँग्रेसला ते जड गेले असते.

Web Title: Congress leaders will be excited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.