अंकलखोपमध्ये काँग्रेस उमेदवारीसाठी उड्या!

By admin | Published: January 6, 2017 11:14 PM2017-01-06T23:14:11+5:302017-01-06T23:14:11+5:30

खुला मतदारसंघ : भाजप, राष्ट्रवादीच्या गटात अद्याप ‘शांती ही शांती’; पाच वर्षांत अनेक बदल

Congress lifts for candidature in Ankulopop! | अंकलखोपमध्ये काँग्रेस उमेदवारीसाठी उड्या!

अंकलखोपमध्ये काँग्रेस उमेदवारीसाठी उड्या!

Next



राजेंद्र खामकर ल्ल अंकलखोप
पलूस तालुक्यातील अंकलखोप जिल्हा परिषद गट खुला झाल्याने कॉँग्रेसमधून अनेक इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामुळे कॉँग्रेस नेते पेचात पडले आहेत. इच्छुकांनी पक्षाकडे शुल्क भरून अर्ज दाखल केले आहेत. दुसरीकडे भाजप व राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची संख्या कमी असून, पक्ष ज्याला तिकीट देईल, त्याच्यामागे शक्ती उभी करण्याचा मनोदय उमेदवारांनी व्यक्त केला आहे.
कॉँग्रेस पक्षाकडे तब्बल १२ ते १३ उमेदवारांनी मागणी नोंदवली असून त्यामध्ये माजी ल्हिा परिषद सदस्य दादासाहेब सूर्यवंशी, सतीश पाटील, हणमंत पाटील, अजित शिरगावकर, विशाल सूर्यवंशी, उदयसिंह सूर्यवंशी, प्रल्हाद पाटील, ए. के. चौगुले, सुधीर चौगुले, धैर्यशील पाटील, अरविंद सूर्यवंशी, संतगावचे अरुण सावंत, धनगावचे सतपाल साळुंखे यांचा समावेश आहे. भाजपमधून राजकुमार पाटील, नितीन नवले, सुरेंद्र चौगुले, नागठाणेचे विजय पाटील, बुर्लीचे प्रमोद मिठारी, धनगावचे दीपक भोसले यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादीमधून अंकलखोपचे उमेश जोशी, विकास पाटील, आमणापूरचे पोपट फडतरे यांच्यावर पक्षाची मदार आहे. २०१२ च्या निवडणुकीत अंकलखोप गट स्त्री राखीव होता. यामध्ये राष्ट्रवादी व कॉँग्रेस अशी लढत होऊन कॉँग्रेसच्या शीलाताई सूर्यवंशी यांनी राष्ट्रवादीच्या सुमन सूर्यवंशी यांचा केवळ शंभर मतांनी पराभव केला होता. राष्ट्रवादीच्या हातातून ही जागा थोडक्यात गेली होती. मतदार संघाच्या पुनर्रचनेनुसार यावेळी बुर्ली गावाचा समावेश अंकलखोप मतदारसंघात झाल्याने निवडणुकीत रंगत आली आहे.
अंकलखोप जिल्हा परिषद गटात अंकलखोप, नागठाणे, संतगाव, सूर्यगाव, आमणापूर, बुर्ली, धनगाव, ब्रह्मानंदनगर या गावांचा समावेश आहे.
पाच वर्षात अनेक स्थित्यंतरे झाल्याने कॉँग्रेसचे माजी मंत्री आ. पतंगराव कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, राष्ट्रवादीचे नेते अरुण लाड कोणता पत्ता टाकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंकलखोप पंचायत समिती गण व आमणापूर गण खुल्या गटातील महिलांसाठी राखीव आहेत. असे पाहिल्यांदाच झाले आहे. तिन्ही पक्षांच्यावतीने मतदारांची दुसऱ्या क्रमांकाची संख्या असणाऱ्या नागठाणे गावातून महिलांची चाचपणी सुरू आहे. त्यामुळे अंकलखोप पंचायत समितीसाठी नागठाणेला प्राधान्यक्रम देतील, असे दिसते.
आमणापूरमध्ये प्रत्येकवेळी आर. एम. पाटील यांच्या घराला पक्षाने संधी दिली आहे. यावेळीही त्यांच्या घरातील महिलेला उमेदवारी मिळावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. आमणापूरच्या भाजपच्या कार्यकर्त्यानी आता महिलेची उमेदवारी गावातूनच मिळावी, अशी भूमिका घेतली आहे.
अंकलखोप जिल्हा परिषद गटामध्ये कधी राष्ट्रवादीला, तर कधी कॉँग्रेसला विजय मिळाला होता. यावेळी भाजपचा नव्याने प्रवेश झाला आहे. त्यामुळे यावेळची निवडणूक तिरंगी होणार आहे. कॉँग्रेसमध्ये अनेक इच्छुक असले तरी, तिकीट मात्र एकालाच मिळणार आहे.

Web Title: Congress lifts for candidature in Ankulopop!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.